कोरोनाबाबत सूचना न पाळल्यास कठोर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:30 PM2020-03-14T16:30:03+5:302020-03-14T16:30:52+5:30
कोरोना मास्कची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तसेच डुप्लिकेट माल पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासन सर्व पातळ्यावर उपाययोजना करीत आहे. कोरोना मास्कची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तसेच डुप्लिकेट माल पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिला आहे.
कोरोनाबाबत सोशल मिडियावर खोटा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल अशीही जोड त्यांनी पुढे दिली.
राज्यात कोरोनाचे वाढते प्रस्थ पाहता, शनिवारी गृह व आरोग्य खात्याची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलिस खात्याचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना, नकली माल पुरवणाऱ्यांना व खोटा प्रचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नागरिकांना काही माहिती कळल्यास त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी व काळाबाजार करणाऱ्यांना पकडून द्यावे, असेही आवाहन केले आहे.
तुरुंगातील कैद्यांचीही आरोग्य तपासणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.