बेकरी व इलेक्ट्रिक व्यापाऱ्यांवर कारवाई
By Admin | Published: November 29, 2014 03:00 AM2014-11-29T03:00:39+5:302014-11-29T03:00:39+5:30
महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागाने शुक्रवारी न्यू फाईव्ह स्टार बेकरी व ए.व्ही. सोल्युशन या दोन प्रतिष्ठानांवर धाड घालून कागदपत्रांची तपासणी केली.
नागपूर : महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागाने शुक्रवारी न्यू फाईव्ह स्टार बेकरी व ए.व्ही. सोल्युशन या दोन प्रतिष्ठानांवर धाड घालून कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीत एलबीटी न भरल्याचे उघडकीस आल्याने संबंधितांचे खाते सील करण्यात आले.
टेकानाका, कामठी रोड येथील न्यू फाईव्ह स्टार बेकरीचे डिलर अक्रम हुसैन यांनी २०१३-१४ मध्ये चुकीचे रिटर्न फाईल करीत १५.३८ कोटी रुपयांचा माल नागपुरातील स्थानिक डिलरकडून खरेदी केल्याचे दाखविले. त्यामुळे आपल्यावर कुठलाही एलबीटी थकीत नसल्याचेही त्यांनी कागदोपत्री दाखविले. मात्र, एलबीटी विभागाने कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांनी २०१३-१४ मध्ये ९० लाख ४३ हजार रुपयांचा व २०१४-१५ मध्ये ४९ लाख ४१ हजार रुपयांचा माल शहराबाहेरून आयात केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी एकूण १ कोटी ४० लाख रुपयांवरील एलबीटी भरला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांनी आजवर एलबीटी भरलेला नाही. त्यामुळे न्यू फाईव्ह स्टार बेकरीचे खाते सील करण्यात आले. आता विभागातर्फे नियमानुसार दंडासह एलबीटी आकरण्यात येईल.
धंतोली गार्डनजवळील ए.व्ही. सोल्युशन हे इलेक्ट्रिकल वस्तूंचा व्यवसाय करते.
मात्र, त्यांनी २०१३-१४ मध्ये सुमारे १ कोटी ३४ लाख रुपयांचा माल खरेदी केला. पण एलबीटी रिटर्न फाईल केला नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचेही खाते सील करण्यात आले. आता विभागातर्फे नियमानुसार दंडासह एलबीटी आकारला जाईल. एलबीटी अधिकारी व्ही.एस. जिचकार, सहायक अधिकारी रमेश गिरी, सुमेर गजभिये, विकास चहांदे, संजय मेंडुले, रमेश पडघन, सुरेश धुपे, दत्तराज वानखेडे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)