नागपुरात विना हेल्मेटने दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:35 AM2018-08-07T01:35:56+5:302018-08-07T01:37:30+5:30
पोलिसांनी हेल्मेटसक्ती करूनही अनेक दुचाकीचालक दाद देत नसल्याचे पाहून, वाहतूक शाखेने आज पुन्हा शहरातील विविध भागात हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली. रात्रीपर्यंत नेमकी किती दुचाकीचालकांवर कारवाई झाली, त्याचा अधिकृत आकडा पोलिसांकडून मिळू शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी हेल्मेटसक्ती करूनही अनेक दुचाकीचालक दाद देत नसल्याचे पाहून, वाहतूक शाखेने आज पुन्हा शहरातील विविध भागात हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली. रात्रीपर्यंत नेमकी किती दुचाकीचालकांवर कारवाई झाली, त्याचा अधिकृत आकडा पोलिसांकडून मिळू शकला नाही.
दुचाकीच्या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्याने दुचाकीचालकाचे जीव गेल्याचे अनेकदा पुढे आले आहे. त्यामुळे दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवाव्यात, असे आवाहन पोलीस आणि सामाजिक संस्था, संघटना वारंवार करतात. न्यायालयानेही हेल्मेटसक्तीचे आदेश दिले आहे. विविध शहरांसह नागपुरातही या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनेकदा हेल्मेटसक्तीची विशेष मोहीम राबविली आहे. नागपुरात अशा विशेष मोहिमेत एका दिवशी चक्क दोन हजार दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई झाल्याचेही उदहारण आहे. ही मोहीम सुरू झाली की कारवाईच्या धाकाने दुचाकीचालक हेल्मेट घालतात, नंतर मात्र परत ते हेल्मेटविना दुचाकी चालवितात. जीवघेणे अपघात होऊनही हेल्मेटबाबत अनास्था दाखविणाºया दुचाकीचालकांना पोलिसांचा धाक वाटत नाही. वारंवार सूचना देऊन, गांधीगिरी करूनही अनेक दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. पकडले गेले की तेवढ्या वेळेपर्यंत ते आर्जवविनंती करतात. कार्यालयात जायचे आहे, कॉलेजमध्ये जायचे आहे, असे सांगून ते आपली सुटका करून घेतात, नंतर परत असेच सुरू होते. ते ध्यानात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळपासून विविध भागात विना हेल्मेटने दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावला. विना हेल्मेटने दुचाकी चालविणाºयांचे सर्वात जास्त प्रमाण तरुणाईचे आहे. सुसाट वेगाने दुचाकी चालविण्याची, बेपर्वाई तरुणाईत विशेषत: कॉलेजिअन्समध्ये जास्त दिसून येते. त्याची आज सोमवारी पुन्हा एकदा प्रचिती आली.
विद्यार्थिनींना दिला धडा
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईदरम्यान तीन विद्यार्थिनी दुचाकीवर हेल्मेटविना ट्रिपलसीट येताना दिसल्या. या तिघींना थांबवून पोलिसांनी हेल्मेटबाबत विचारणा केली. त्यांनी कॉलेजला जायचे आहे, असे सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्यांना शांतपणे कारवाईची कल्पना देत आॅटोने घरी परत पाठविले. हेल्मेट घेऊन या आणि नंतरच दुचाकी घेऊन जाण्यास सांगितले. वेगवेगळी सबब सांगूनही पोलीसदादा ऐकत नसल्याचे पाहून शेवटी त्या विद्यार्थिनी आॅटोने घराकडे गेल्या. पोलिसांनी आज त्यांना दिलेला धडा त्यांच्यासह आजूबाजूच्या अनेक दुचाकीचालकांना आठवणीत राहणारा आहे.
कॉलेजमध्ये व्हावी सक्ती !
सुरक्षित जीवनाचे धडे शाळा-महाविद्यालयातून दिले जातात. पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांचे सामाजिक ज्ञान आणि जागरूकता वाढावी म्हणून शाळा-महाविद्यालयातून प्रयत्न होतात. दहावी पास झाल्यानंतर महाविद्यालयात दुचाकीने जाण्याचे प्रमाण फारच जास्त आहे. मात्र, दुचाकीने महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी अन् विद्यार्थिनी हेल्मेटचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांना हेल्मेटची आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे. विना हेल्मेटने दुचाकी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयाच्या आवारात येऊ देऊ नये, असे मत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी व्यक्त केले आहे.