विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डिलरवर कारवाई : परिवहन विभागाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:15 AM2019-12-24T00:15:34+5:302019-12-24T00:17:16+5:30
विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आले असलेतरी राज्यात शेकडो वाहनांना नंबरप्लेट मिळण्यास उशीर होत आहे. विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले आहे. विक्री झालेली वाहने विनानंबर प्लेट शिवाय देऊ नये, असे आदेशही डिलर्सला देण्यात आले आहे. परंतु यात आरटीओ कार्यालयांकडूनच नव्या वाहनांची नोंदणी होण्यास व नंबर मिळण्यास उशीर होत असल्याचे सामोर आले आहे.
राज्यात १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ ची सक्ती करण्यात आली. परंतु पूर्वी वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट लागेपर्यंत १५-२० दिवसांचा कालावधी लागायचा. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी नंबरप्लेटच्या प्रक्रियेत काही सुधारणा केल्या. सोबतच‘एचएसआरपी’प्लेट पुरवठा करणाऱ्या पुरवठादार संख्या वाढविण्याच्या सूचना वाहन कंपन्यांना देण्यात आल्या. यामुळे नंबरप्लेट मिळण्याचा कालावधी आता आठ दिवसांवर आला आहे. परंतु परिवहन आयुक्तांनी काढलेल्या नव्या सूचनांमध्ये प्रलंबित असलेल्या वाहनांना दोन दिवसांत ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचे व ‘एचएसआरपी’प्लेट बसविल्याशिवाय वाहनांचा ताबा मालकांना देऊ नये असे निर्देश दिले. याचे उल्लंघन झाल्यास १० हजारांचा दंडही आकारण्याचा इशाराही देण्यात आला. यामुळे डिलर्समध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर एका डिलर्सने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, डिलर्सकडून वाहनाची विक्री झाल्यानंतर त्याच दिवशी मोटार वाहन निरीक्षक वाहनाची तपासणी करीत नाही. ते दुसऱ्या दिवशी करतात. त्या दिवशी रात्री उशीरा ते संगणकावर तशी नोंद करतात. यामुळे तिसऱ्या दिवशी डिलर्सला ‘रोड टॅक्स’ भरावा लागतो. याच दिवशी किंवा चवथ्या दिवशी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहनांच्या कागदावर स्वाक्षरी करतात. पाचव्या दिवशी लिपीक वाहनांना नंबर देतो. डिलर्स त्यांच्या वाहनांना पडलेले नंबर ‘एचएसआरपी’प्लेट तयार करणाऱ्या सेवापुरवठादाराकडे पाठवितो. सहाव्या किंवा सातव्या दिवशी डिलर्सकडे ही नंबरप्लेट येते. त्याच दिवशी किंवा आठव्या दिवशी नंबर प्लेट लावली जाते. नंबरप्लेटवरील सोपस्कारासाठी आरटीओ कार्यालयच पाच दिवस घेते. परंतु दंडात्मक कारवाईची भिती डिलर्सला दाखवली जात असल्याचेही ते म्हणाले.