बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या नागपुरातील प्रतिष्ठानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:41 PM2018-11-20T21:41:54+5:302018-11-20T21:43:15+5:30
दिवाळीत कागदी बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या १९ प्रतिष्ठानांवर वैधमापनशास्त्र विभागाने करून नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत कागदी बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या १९ प्रतिष्ठानांवर वैधमापनशास्त्र विभागाने करून नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.
विभागाने नागपुरात दिवाळीत विशेष तपासणी मोहीम राबविली. त्यात मिठाईची विक्री करणाऱ्या ५० पेक्षा जास्त रेस्टॉरंटची तपासणी केली. त्यापैकी १९ रेस्टॉरंटमध्ये वजनात बॉक्समध्ये मिठाई ठेवून विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्यांना नोटीस बजावण्यात आल्या. विभागात त्यांची सुनावणी होऊन दंड आकारण्यात येणार आहे. एक किलोपर्यंत मिठाई खरेदी करताना ग्राहकांना बॉक्सच्या वजनाएवढी ३० ते ७० ग्रॅमपर्यंत मिठाई कमी मिळते. मिठाईची किंमत पाहता ग्राहकांना १५ ते २५ रुपयांचा फटका बसतो. ग्राहक बॉक्समध्ये मिठाई खरेदी करतो तेव्हा त्यांना त्याची कल्पना नसते. अशाप्रकारे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊन आर्थिक तोटा होतो.
दुकानदारांनी केवळ वस्तूंचे वजन करावे
वैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पॅकिंग वस्तू, किराणा दुकानातून खरेदी किंवा रेस्टॉरंटमधून खरेदी करताना ग्राहकांनी मॅन्युअल अथवा डिजिटल तोलमापन यंत्र निरखून पाहावे आणि नंतरच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना कागदी बॉक्सचा वस्तूच्या वजनात समावेश होत नाही.
भाजीबाजारात कांदे वा बटाटे खरेदी करताना दुकानदार काट्यात भांडे ठेवून वजन करतो. अशावेळी ग्राहकांनी आधी भांड्याचे वजन तपासून पाहावे आणि नंतरच खरेदी करावी. पण अनेकदा ग्राहकांचे लक्ष विचलित करून दुकानदार कांदे आणि बटाटे भांड्यासह मोजून देतात. त्यामुळे ग्राहकांना वजन कमी मिळून त्यांचे नुकसान होते.
ग्राहकांनीही दक्ष राहावे
बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकांना दक्ष राहण्याची गरज आहे. दिवाळीत अनेक रेस्टॉरंटमध्ये बॉक्ससह मिठाईची विक्री केल्याचे दिसून आले. बॉक्ससह मिठाईची विक्री न करण्याची सूचना रेस्टॉरंट चालकांना विभागाने पूर्वीच दिली आहे. त्यानंतरही बॉक्ससह मिठाई विक्री सुरूच आहे. विभागाने दिवाळीत मोहीम राबवून रेस्टॉरंटची तपासणी केली आणि १९ प्रकरणांमध्ये ग्राहकांना मिठाई कमी मिळाल्याचे आढळून आले. नियमानुसार त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागून दंड आकारण्यात येणार आहे.
हरिदास बोकडे, सहायक नियंत्रक,
वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर.