कुख्यात गुंड आंबेकरच्या बांधकामावर सलग पाचव्या दिवशी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:02 PM2019-12-09T22:02:12+5:302019-12-09T22:03:42+5:30
इतवारी भागातील दारोडकर चौका लगतच्या इतवारी शाळेजवळ कुख्यात गुंड संतोष आंबेकर व अण्णाची मोझरकर यांनी बांधलेली बहुमजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी भागातील दारोडकर चौका लगतच्या इतवारी शाळेजवळ कुख्यात गुंड संतोष आंबेकर व अण्णाची मोझरकर यांनी बांधलेली बहुमजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे सुरू आहे. सोमवारी सलग पाचव्या दिवशी या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील स्लॅब तसेच दक्षिण व उत्तर दिशेकडील भिंती तोडण्यात आल्या.
आंबेकर याने महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले होते. परंतु मागील अनेक वर्षात या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी आंबेकरला अडट केल्यानंतर महापालिकेने त्याच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला आहे.
प्रवर्तन विभागाच्या दुसऱ्या पथकाने महाल झोन क्षेत्रातील सेवा सदन चौक गीतांजली टॉकीजकडे जाणाऱ्या गल्लीतील स्पे्र पेंटींग दुकानासमोरील लोखंडी ठेला हटविण्यासाठी पथक पोहचले असता दुकान मालकाने ४० ते ५० लोकांचा जमाव एकत्र करून कारवाईला विरोध दर्शविला. यामुळे कारवाई करता आली नाही. त्यानंतर पथकाने पन्नालाल देवडिया चौक येथील स्वेटर व कपडे विक्रे त्यांची दुकाने हटविली. तसेच पन्नालाल देवडिया शाळा ते नंगापुतळा परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले.
ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त आशोप पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात नितीन मंथनवार, भास्कर मालवे, शाबाद खान, विशाल ढोले व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.