निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 09:31 PM2022-10-22T21:31:56+5:302022-10-22T21:32:22+5:30
Nagpur News खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतूकदारांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर : दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतूकदारांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहेत.
सर्व खासगी बस वाहतूकदारांनी आपली खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी.प्रमाणे खासगी बसमालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडेबाबतचा विहीत नमुन्यात तक्ता तयार करून व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी बस वाहतूकदारांच्या बुकिंग कार्यालयाच्या बाहेरील दर्शनी भागी प्रवाशांना सहजपणे दिसेल अशा प्रकारे प्रसिध्द करावा आणि प्रवाशांकडून शासन निर्णयाप्रमाणे भाडे आकारावे.
प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत dycommr.enf@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय केली आहे, याची सर्व खासगी बस वाहतूकदार आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी कळविले आहे.