कस्तूरचंद पार्कमध्ये हाणामारी
By admin | Published: September 25, 2016 03:12 AM2016-09-25T03:12:27+5:302016-09-25T03:12:27+5:30
कस्तूरचंद पार्कवर लागलेल्या प्रदर्शनात पार्किंच्या मुद्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
पार्किंगमुळे वाद : वाहनचालकांकडून अवैध वसुली,तिघे जबर जखमी
नागपूर : कस्तूरचंद पार्कवर लागलेल्या प्रदर्शनात पार्किंच्या मुद्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली करणाऱ्या एका गटातील आरोपींनी जोरदार हल्ला चढवल्याने प्रदर्शनाच्या आयोजकांसह तिघे जबर जखमी झाले. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या या हाणामारीमुळे कस्तूरचंद पार्क परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कस्तूरचंद पार्कमध्ये अशपाक अली नामक कंत्राटदाराने एम्युजमेंट पार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येथे येणाऱ्यांच्या वाहनचालकांना पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था आयोजकांनी केली आहे. मात्र, प्यारू नामक व्यक्तीने आपल्या साथीदारांसह येथे अवैध पार्किंग सुरू करून वाहनचालकांकडून वसुली करणे सुरू केले. त्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजकांमध्ये तसेच पार्किंगची अवैध वसुली करणारे यांच्यात शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वाद सुरू झाला. आयोजकांनी मोफत पार्किंग करण्याबाबत वाहनचालकांना सूचना देऊन बोलवणे सुरू केल्याने प्यारू आणि त्याच्या साथीदारांनी अशपाक अली (वय ४५) यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्याचे रुपांतर हाणामारी झाले. प्यारू आणि त्याच्या साथीदारांनी अशपाक अली तसेच त्यांचे कर्मचारी चमनभाई (वय ५५) आणि अशफाक भाई (वय २५) यांच्यावर दंडुक्याने जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे अशपाक अली यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तर, चमनभार्इंच्या डोक्यावर जबर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच सदर पोलिसांचा ताफा कस्तूरचंद पार्कमध्ये पोहचला. त्यांनी दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन्हीकडून समेट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलीस सांगत होते. (प्रतिनिधी)