लेटलतिफ डॉक्टरांवर कारवाई
By Admin | Published: May 10, 2017 02:38 AM2017-05-10T02:38:19+5:302017-05-10T02:38:19+5:30
कामगारांसाठी आशेचे किरण असलेल्या राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामगार रुग्णालयातील ‘लेटलतिफ’ डॉक्टरांचे पितळ उघड पडताच
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय : उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगारांसाठी आशेचे किरण असलेल्या राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामगार रुग्णालयातील ‘लेटलतिफ’ डॉक्टरांचे पितळ उघड पडताच याची गंभीर दखल राज्य कामगार विमा योजनेच्या संचालकांनी घेतली. त्यांनी मंगळवारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरत उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. रुग्णाविषयी डॉक्टरांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी ताकीदही दिली.
दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील या कामगार विमा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ९ वाजताची असताना डॉक्टर आपल्या सोयीनुसार एक-दीड तास उशिरा येतात. या संदर्भातील वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने ‘डॉक्टर घरी, रुग्ण वाऱ्यावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. स्वत: संचालकांनी याला गंभीरतेने घेतले. तर ‘लोकमत’च्या या वृत्तामुळे कामगार रुग्णालयाची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येईल, असा विश्वास रुग्ण व नातेवाईकांनी व्यक्त केला.
सोमवारी सकाळी ९ वाजता ‘लोकमत’ चमूने या रुग्णालयाची पाहणी करीत बाह्यरुग्ण विभागात ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यात नोंदणी कक्षाची वेळ सकाळी ८.३० वाजताची असताना हा कक्ष तब्बल ९.४५ वाजता सुरू झाला होता. सकाळी १० वाजेपर्यंत डॉक्टरांचे सर्वच कक्ष रिकामे होते. त्यानंतर एक-एक डॉक्टर यायला सुरुवात झाली. कान, नाक, घसा विभागात तर १०.४५ वाजेपर्यंत डॉक्टरांचे आगमन झालेले नव्हते. याचे छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले. हे वृत्त मुंबईत बसलेले राज्य कामगार विमा योजनेचे संचालक (प्रशासन) कि.वी. वाव्हूळ यांच्यापर्यंत पोहचले. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक मीना देशमुख यांना फोन करून यासंदर्भात आश्चर्य व्यक्त करीत कारवाईचे आदेश दिले, सोबतच डॉक्टरांना सकाळची ८.३० वाजताची वेळ पाळण्याच्या सूचनाही दिल्या. वृत्ताचा सर्वात जास्त धसका कर्मचाऱ्यांनी घेतला. प्रत्येक कर्मचारी रुग्णालयात वेळेपूर्वी हजर झाला होता.
उशिरा येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार
राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील डॉक्टरांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांनी सकाळी ८.३० वाजताची वेळ पाळलीच पाहिजे.
-कि. वी. वाव्हूळ
संचालक (प्रशासन) राज्य कामगार विमा योजना मुंबई
नोटीस बजावली आहे
उशिरा येणाऱ्या डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शिवाय रुग्णालयाच्या वेळेत हजर राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. बंद बायोमेट्रिक सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय
कधी नव्हे ते नोंदणी कक्ष वेळेत झाले सुरू
‘लोकमत’च्या वृत्तामुळे कधी नव्हे ते बाह्यरुग्ण विभागाचे नोंदणी कक्ष सकाळी ८.३० वाजता सुरू झाले. आज येथे तीन कर्मचारी कार्यरत होते. यामुळे नेहमी लागणारी लांबलचक रांग कमी झाली होती. यावेळी उपस्थित रुग्णांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केल्यावर त्यांनी या रुग्णालयात रोज येत जा, रुग्णालयात सुधारणा होईल, असा आशावादही व्यक्त केला. आज दिवसभर रुग्णालयात वृत्ताची चर्चा होती.
डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा कळस
‘लोकमत’च्या वृत्तामुळे मंगळवारी ‘लेटलतिफ’ डॉक्टर वेळेवर येतील, अशी अशा रुग्ण बाळगून होते, परंतु त्यांची पार निराशा झाली. नेहमीसारखे डॉक्टर उशिरा पोहचले. ओपीडीची वेळ सकाळी ९ वाजताची असताना तब्बल १३ डॉक्टर सकाळी १० नंतर आपापल्या विभागात पोहचले. डॉ. पवार व डॉ. लवंगे रुग्णांना वेठीस धरत ११ वाजता ओपीडीत पोहचले. डॉक्टरांचा रुग्णाप्रति हा बेजबाबदारपणाचा कळस असल्याचे रुग्णांचे म्हणणे होते. मंगळवारी उशिरा आलेल्या डॉक्टरांची नावे संचालकांना देण्यात आली आहे.