मीरा वाईन्स शॉप व हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बारवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:18 PM2019-04-27T22:18:54+5:302019-04-27T22:20:44+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे. लोकमतने ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची सोय’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मीरा वाईन शॉप आणि हॉटेल जी-९ रेस्टॉरंट व बार येथे अचानक भेट देऊन दोन्ही ठिकाणी अटी व नियमांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यानंतर विभागीय गुन्हा नोंदविला आहे. लोकमतने ‘वाईन शॉपच करून देतात पिण्याची सोय’ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
या वृत्ताने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत दुपारीच दोन्ही दुकानांची प्रत्यक्ष पाहणी केली. वृत्तातील सत्यस्थिती त्यांना दिसून आली. तसेच एप्रिल महिन्यात शहरात नियमांचा भंग करणाऱ्या व जादा दराने मद्य व बीअर विकणाऱ्या २० लायसन्सीवर विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सर्व प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा घेऊन सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यात शहरात सर्वच बीअर शॉपीमध्ये ‘चिल्ड’ या नावाखाली बीअर आणि वाईन्स शॉपीमध्ये मद्य एमआरपी किमतीपेक्षा जास्त दर आकारून विकण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेकांनी लोकमतकडे केल्या असून या सर्व दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.