वैरीण बनलेल्या मातेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:14+5:302021-06-01T04:07:14+5:30
सासूशी वाद : चिमुकल्याला अमानुष मारहाण : व्हिडिओ व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सासूसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून ...
सासूशी वाद : चिमुकल्याला अमानुष मारहाण : व्हिडिओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सासूसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला धाव घेऊन बाळावर औषधोपचार केले.
सदर महिला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचा पती ढोलताशा पथकात काम करतो. तिला एक सहा महिन्यांचे गोंड्स बाळ आहे. घरगुती वादातून तिचे सासूशी अजिबात पटत नाही. या पार्श्वभूमीवर, २४ मे रोजी तिचा सासूसोबत घरात वाद सुरू झाला. सासू-सुनेचे तोंड वाजत असतानाच बेडवर बसलेल्या महिलेने तिच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण सुरू केली. ती त्याला वारंवार गादीवर आपटत होती. या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती त्याला गालावर, तोंडावर, पाठीवर सारखी मारत होती. हा व्हिडिओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती काढून लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेऊन डॉक्टरकडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले.
आज सकाळी ती महिला, तिचे नातेवाईक, शेजारी तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर साधना हटवार, मीनाक्षी धडे यांनाही पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांच्यासमोर महिलेची चौकशी करण्यात आली. नंतर तिला सूचना पत्र देऊन सोडण्यात आले.
---
बाल संरक्षण समितीसमोर पेशी या घटनेमुळे सामाजिक वर्तुळ ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, सदर महिलेची तिच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत मंगळवारी बाल संरक्षण समितीसमोर पेशी होणार आहे.
---