टंचाईग्रस्त गावांसाठी ४२ कोटी ४८ लक्ष रुपयाचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:22 PM2019-05-04T23:22:01+5:302019-05-04T23:26:49+5:30

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

An action plan of 42 crores 48 lacs for scarcity-hit villages | टंचाईग्रस्त गावांसाठी ४२ कोटी ४८ लक्ष रुपयाचा कृती आराखडा

टंचाईग्रस्त गावांसाठी ४२ कोटी ४८ लक्ष रुपयाचा कृती आराखडा

Next
ठळक मुद्दे१२८५ उपाययोजनांना मंजुरी : ३३ गावात ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूशुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.
बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय पाणीटंचाईचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता जितेंद्र्र तुरखेडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ३३ गावांना ५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ तर नागपूर ग्रामीणमध्ये २३ टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा करताना जंतूविरहित पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची असून पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टँकरवर जी.पी.आर.एस. यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर पुरवठादारांचे देयक अदा करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना ग्रामीण तसेच नगर परिषद क्षेत्रात पाण्याचा स्रोत निश्चित करताना भूगर्भातील पाणी निजंर्तुकीकरण केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने वाढत असल्यामुळे या नागरी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले वाडी, वानाडोंगरी, मोवाड, कळमेश्वर येथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
वाडीसाठी वेण्णा धरणाच्या मृत जलसाठ्यातून काही भागाला पाणीपुरवठा होत आहे. तसेच १४ विहिरी व १४ कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होत असून, अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची शुध्दता तपासणी केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वानाडोंगरी येथे बोरगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असून, वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी योजना म्हणून कान्होलीबारा प्रकल्पातून नवीन नळपाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. यासाठी ४२ हजार रुपये खर्च येणार आहे. ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळमेश्वर शहरासाठी पेंचमधून पाणीपुरवठा होत असून, या शहराला कोच्छी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना तीन महिन्यात मंजूर होईल. यासाठी मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले. मोवाड नगरपरिषदेला अधिग्रहित केलेल्या विंधन विहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने कृतिआराखड्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
टंचाईसाठी बीडीओ नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी राहणार आहेत तसेच नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांचेवर संपूर्ण जबाबदारी आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असून, त्यांनी दर आठ दिवसांनी टंचाई आराखड्यानुसार अंमलबजावणीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
असा आहे कृती आराखडा
पाणीटंचाई कृतिआराखड्यानुसार ९९५ गावात १२८५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे यासाठी २५ कोटी ९८ लक्ष रुपयांचा खर्च येणार आहे. मंजूर आराखड्यानुसार १० उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, येत्या आठ दिवसात या योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. टंचाई कृतिआराखड्यानुसार ३७४ गावात ६२३ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार असून, यासाठी ८ कोटी ७० लक्ष रुपये, नळयोजनांसाठी विशेष दुरुस्ती ३७५ गावात करण्यात येणार आहे यासाठी १५ कोटी ५० लक्ष रुपये तर विहिरी खोल करणे व गाळ काढणे यासाठी १ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत खाजगी विहिरींचे अधिग्रहण तात्पुरत्या नळयोजनांची दुरुस्ती आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

 

Web Title: An action plan of 42 crores 48 lacs for scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.