‘अॅट्रॉसिटी’चा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
By admin | Published: September 19, 2016 03:01 AM2016-09-19T03:01:00+5:302016-09-19T03:01:00+5:30
वंचित समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ‘अॅट्रॉसिटी’ कायदा अस्तित्वात आला
नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन : नागपूर विद्यापीठातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर : वंचित समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ‘अॅट्रॉसिटी’ कायदा अस्तित्वात आला. परंतु जर ‘अॅट्रॉसिटी’चा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या कायद्याचा गैरवापर का होतो आहे हेदेखील शोधले गेले पाहिजे, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी मंजुळे यांनी हे वक्तव्य केले.
विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे होते. याशिवाय प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.भाऊ दायदार, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.निहाल शेख, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक रवींद्र पुंडलिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द व्हावा अशी मागणी होत आहे.
या कायद्याचा गैरवापर का होत आहे, याबाबत नीट चौकशी व्हावी. ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द झाला तर परिस्थितीत खरेच किती फरक पडेल याबाबतदेखील सखोल अभ्यास व्हावा, असे नागराज मंजुळे म्हणाले. जीवनात आपल्याला अनेक जण मार्गदर्शन करतात. परंतु अनेक विचारवंत ऐकले की संभ्रम वाढतो. त्यामुळे जगण्यातूनच आपण शिकले पाहिजे.
‘एनएसएस’ हे जगण्यातून शिकविणारे माध्यम आहे. यातून माणूस तर घडतोच. शिवाय हरणे पचवायलादेखील शिकवितो. अनेकदा विद्यापीठातून शिकविलेले शिक्षण कुचकामी ठरते. शिक्षणामुळे एक रुबाब येतो व काही वेळा हाच रुबाब प्रगतीच्या आडदेखील येतो. मला असाच अनुभव आला आहे, असेदेखील मंजुळे यांनी यावेळी सांगितले.एक काळ होता ज्यावेळी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन होते. जे दिसायचे ते खोटे आहे, हे सर्वांना माहीत असायचे. परंतु आता स्थिती बदलते आहे. वास्तववादी चित्रपटांमुळे जनप्रबोधन होत आहे, असे प्रतिपादन डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले. डॉ.प्रमोद येवले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले, तर पूरण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. नागराज मंजुळे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर डॉ.भाऊ दायदार यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)