कारवाई मंदावली, देखाव्यापुरत्या लावल्या चिठ्ठ्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:32+5:302021-08-20T04:11:32+5:30
मिठाईच्या दुकानांवर अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांचे उल्लंघन आकांक्षा कनोजिया नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सणासुदीला बाजार बंद आहेत. ...
मिठाईच्या दुकानांवर अन्न सुरक्षा विभागाच्या नियमांचे उल्लंघन
आकांक्षा कनोजिया
नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सणासुदीला बाजार बंद आहेत. त्यात आता सवलत मिळाल्यामुळे बाजारात गर्दी होत आहे. राखीचा सण जवळ येताच मिठाईच्या दुकानांवर गर्दी होत आहे. मिठाईच्या शुद्धतेसाठी मागील वर्षी तयार केलेल्या नियमांचा परिणाम काही दुकानांवर दिसून आला. खुल्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेटची चिठ्ठी काही नामवंत दुकानावर लावण्यात आली. परंतु इतर दुकानांवर मात्र तारीख लिहिलेली नसल्याचे आढळले.
‘लोकमत’च्या चमूने बाजाराची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई मंदावली आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये कुठलीही भीती दिसत नाही. आतापर्यंत केवळ ३५ मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. अन्न विभागातर्फे मंदगतीने कारवाई करण्यात येत असल्यामुळे दुकानदारांचे मनसुबे उंचावले आहेत. त्यामुळे लहान दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पृर्वी केवळ सीलबंद वस्तूंवर क्वाॅलिटी, उत्पादनापासून एक्स्पायरी डेट लिहिलेली असायची. परंतु खुल्या सामानावर क्वाॅलिटी, उत्पादन व एक्स्पायरी डेटसाठी कोरोनानंतर नियम तयार करण्यात आले. काही दुकानदारांनी खुल्या मिठाईवर एक्स्पायरी डेट लिहिणे सुरू केले. तर काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
..........
कारवाई करण्यात उदासीनता
खुल्या सामानावर त्याची क्वाॅलिटी, उत्पादन व एक्स्पायरी डेटच्या प्रकरणात केवळ ३५ दुकानांची तपासणी करण्यात आली. यातील सात ते आठ दुकानांना दंड लावण्यात आला. त्यामुळे दुकानदार आताही नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक दुकानात तर याबाबतची चिठ्ठी लावलेली नाही. काही ठिकाणी सर्व मिठाईवर एक्स्पायरी डेट लिहिण्यात आली आहे. अशास्थितीत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
...........