अस्वच्छता पसरविणाऱ्या ११४ लोकांवर कारवाई
By मंगेश व्यवहारे | Published: June 25, 2024 02:53 PM2024-06-25T14:53:55+5:302024-06-25T15:02:47+5:30
Nagpur : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्या ११४ लोकांवर कारवाई
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्या ११४ लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ६०४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सार्वजनिक ठिकाण, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणाऱ्या ४ लोकांवर कारवाई करून ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकल्यामुळे ४० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १० व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने त्यांच्यावर कारवाई करून १००० रुपये दंड वसूल केला गेला. दुकानदारांनी रस्त्यावर कचरा टाकल्याच्या १० कारवाया करण्यात आल्या असून, ४ हजार रुपये दंड वसूल केला गेला. २ मोठ्या आस्थापनांवर कारवाई करून ४ हजाराचा दंड वसूल केला गेला. वाहतुकीच्या रस्त्यावर मंडप टाकून रस्ता अडवून धरल्या प्रकरणी ६ लोकांवर कारवाई करून १९ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
शाळेवरही कारवाई
धरमपेठ झोन अंतर्गत सारथी पब्लिक स्कुल दाभा यांनी परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स व होर्डिंग लावल्याने त्यांच्यावर कारवाई करून ५ हजार रुपये दंड वसूल केला गेला. प्रतिबंधित प्लास्टीक पिशवीचा वापर करणाऱ्या तांडापेठ येथील विठ्ठल स्वीट्स मार्टवर कारवाई करून ५ हजाराचा दंड वसूल केला. तर शक्तीमातानगर वाठोडा येथील जी इन्फ्रा यांनी बांधकामाचा कचरा रस्त्यालगत टाकल्याने कारवाई करून १० हजाराचा दंड वसूल केला गेला.