नागपुरात मास्क न लावणाऱ्या २८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:01 AM2020-07-19T00:01:18+5:302020-07-19T01:39:17+5:30
तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाºया २८ महिला-पुरुषांवर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या २८ महिला-पुरुषांवर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. फिरायचे असेल तर घराजवळच्या मैदानात फिरा, अशाही सूचनावजा निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सिव्हिल लाईन्समधील मुख्यमंत्री निवासस्थान ते पोलीस जीमखाना चौकापर्यंतच्या मार्गावर सकाळ-सायंकाळ दूरदूरची मंडळी फिरण्यासाठी गर्दी करतात. सायंकाळी ५ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत वॉकर्सवर तरुण-तरुणी, महिला-पुरुषांची मोठी गर्दी असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तोंडावर मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे निर्देश दिले असतानादेखील वॉकर्सवर फिरणाऱ्यांमध्ये विना मास्क लावणाऱ्याची संख्या मोठी असते. ही माहिती कळाल्यानंतर परिमंडळ -२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी सदर पोलीस ठाण्यातील ताफा सोबत घेऊन शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास विना मास्कने फिरणाऱ्य महिला-पुरुष अशा सर्व जणांची कानउघाडणी केली. त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे सदर पोलिसांना निर्देश दिले. त्यानुसार २८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात चार महिलांचाही समावेश आहे.