थर्टीफर्स्टला ८० धुंद तळीरामांवर कारवाई; १४९९ वाहनचालकांकडून इतक्या लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:27 PM2023-01-02T16:27:46+5:302023-01-02T16:30:14+5:30
अजनीत केंद्रीय विद्यालयाजवळ कार उलटली, चालक जखमी
नागपूर : थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी मद्यधुंद वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी जागोजागी तगडा बंदोबस्त लावला होता. दरम्यान, मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८० तळीरामांवर आणि मोटार वाहन कायद्यानुसार १४९९ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे, तर अजनीत केंद्रीय विद्यालयाजवळ पहाटे २.२० वाजताच्या सुमारास कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्यामुळे कारचालक जखमी झाल्याची घटना घडली.
कुणाल संजय देवतळे (३०, मनीषनगर) असे अपघातात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. मेडिकल हॉस्पिटल मार्गावरील केंद्रीय विद्यालयाजवळ हा कारचालक आपली कारने (एम. एच. ३४, ए. ए-७२७२) जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि पलटी झाली. यात कारचालक कुणाल जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी कारचालकाला मेडिकलमध्ये दाखल केले. तेथून नातेवाईक त्याला खासगी रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती अजनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिली. संबंधित कारचालकाविरुद्ध अजनी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
८० तळीरामांना वाहतूक पोलिसांनी पकडले
थर्टीफर्स्टची पार्टी करून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागांत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्ट्यांमध्ये वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवित असल्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागांत तगडा बंदोबस्त लावला होता. तरीदेखील ८० मद्यधुंद तळीराम वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडकले.
मद्य प्राशन करून वाहन चालवित असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तळीरामांना ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत नेण्यात आले. तेथे फॉर्म भरून त्यांच्या वाहनाचे कागदपत्र तपासण्यात आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या तळीरामांच्या नातेवाईकांना बोलावून वाहन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. कारवाई केलेल्या तळीरामांना न्यायालयातून दंडात्मक कारवाई होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तर मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली १४९९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.