गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई : डी. मल्लिकार्जुन रेड्डी
By कमलेश वानखेडे | Published: October 18, 2024 05:45 PM2024-10-18T17:45:14+5:302024-10-18T17:47:26+5:30
Nagpur : डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा थेट फडणवीस- बावनकुळेंवर आरोप
कमलेश वानखेडे- नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या निवडणुकीत रामटेकमधून आपण भाजपा अधिकृत उमेदवार असताना आ. आशीष जयस्वाल हे बंडखोरी करीत अपक्ष लढले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला माझ्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या विरोधात आपरण उठवला असता मला पक्षातून निलंबित करण्यात आले. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समर्थक असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप पक्षातून निलंबित करण्यात आलेले भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकाजून रेड्डी यांनी केला.
डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुणालाही न कळवता परस्पर आशीष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. जयस्वाल यांच्या बंडखोरीमुळे माझा पराव झाला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी मी कशी सहन करणार. जयस्वाल यांच्या उमेदवारीविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेउन सुमारे ५०० जणांनी राजीनामा दिला. माझे म्हणणे समजून न घेता, मला कुठलिही कारणे दाखवा नोटीस न देता फडणविस- बावनकुळे यांच्याकडून ताबडतोब करवाई करण्यात आली. मी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत आहे. गडकरी साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कारवाई केली जात आहे. आज माझ्यावर करवाई झाली, उद्या दुसऱ्यावर होईल. मी याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना पत्र पाठविले आहे. मी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला नको, असे बोललो म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली माझ्यावर करवाई झाली. हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे, असेही ते म्हणाले.
मी पराभूत झाल्यावर देखिल भाजपचे काम करीत आहे. तीन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीचे सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे मला उमेदवारी द्यायची नसेल तर भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आपली मागणी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये आमची लढत थेट जयस्वाल यांच्या सोबत असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही का मान्य करावी, असा सवालही रेड्डी यांनी केला.
गडकरी- फडणवीसांमध्ये मतभेद
भाजप नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. मात्र ते मला उघडपणे बोलता येणार नाही. हा विषय फार मोठा आहे. माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अनिल सोले हे आता सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. तेसुद्धा गडकरी यांचे समर्थक आहेत, असे सांगत रेड्डी यांनी पक्षांतर्गत मोठी धुसफूस सुरू असल्याचा दावा केला.