ईडीची रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई : सहा बँकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 09:35 PM2019-06-06T21:35:38+5:302019-06-06T21:38:15+5:30
शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साखर कारखानदार आणि सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या आणि कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साखर कारखानदार आणि सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या आणि कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कारवाई गुट्टे यांच्या परभणी येथील प्रतिष्ठान व निवासस्थान व बांद्रा वेस्टसह मुंबईत तीन ठिकाणी आणि नागपुरात सिव्हील लाईन्स व रामदासपेठ येथील निवासस्थानी करण्यात आली. कारवाई गोवा, मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयातील २५ अधिकाऱ्यांनी केली.
रत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी प्रा.लि या साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आहेत. गुट्टे यांनी परभणी जिल्ह्यातील २२९८ शेतकऱ्यांच्या नावाने पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एक खासगी बँक अशा सहा बँकामधून ३२८ कोटींचे कर्ज घेतले होते. या सहा बँकांमध्ये आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे.
गुट्टे यांचा परभणी तालुक्यातील गंगाखेड तालुक्यात गंगाखेड शुगर लिमिटेड नावाने साखर कारखाना आणि एस्ट्रा नॅचरल अल्कोहोल (ईएनए) प्रकल्प आहे. काही वर्षांपूर्वी गुट्टे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याची कागदपत्रे, फोटो आदी केवायसी कागदपत्रे तयार करून बँकांकडून ३२८ कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकरी संकटात आले होते. हा घोटाळा रत्नाकर गुट्टे यांचे जवळचे नातेवाईक महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उजेडात आणला होता. त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायदा-२००२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत..
ईडीने सुनील हायटेक कंपनीवर दुसऱ्यांदा धाड टाकली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात ईडीने कोल ब्लॉक प्रकरणात त्यांच्यावर धाड टाकून २५.४४ कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली होती. महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनने कंपनीला चंद्रपूर जिल्ह्यातील आकोली येथील मार्की झरी जामणी कोल ब्लॉकचे वितरण केले होते. कोल ब्लॉककरिता निविदा काढण्यात आल्या होत्या.
या प्रक्रियेत सुनील हायटेक इंजिनिअर्सची एकमेव निविदा होती. सुनील हायटेकला मायनिंगचा कोणताही अनुभव नव्हता. कोल मायनिंग कॉन्ट्रॅक्ट नियमांचे उल्लंघन करून त्यांना कोल ब्लॉक देण्यात आला होता. सुनील हायटेकने हा कोल ब्लॉक मायनिंग व्यवसायासाठी उपकंपनी सुनील हायटेक एनर्जी लिमिटेडकडे हस्तांतरित करून प्रत्येकी १० रुपये किमतीचे एकूण १.८६ लाख शेअर मिळविले होते. त्यानंतर सुनील हायटेकने हे शेअर जास्त प्रीमियम घेऊन जेपी समूह आणि शेल इन्व्हेस्टमेंट कन्सलटन्सी प्रा.लि.ला विकून २५.४४ कोटी रुपये प्राप्त केले होते. रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा विजय गुट्टे यांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. केंद्रीय जीएसटी विभागाने विजय गुट्टेला ३४ कोटींच्या करचोरी प्रकरणात अटक केली होती.
१९२ रुपये गुंतविणारा कोण?
वर्ष २०१२ पर्यंत सुनील हायटेक हे नाव थर्मल पॉवर प्रकल्प उभारणीसाठी प्रचलित होते. कोल ब्लॉक आवंटन घोटाळ्यानंतर पॉवर प्लॅन्ट व्यवसायाची घसरण झाली आणि सुनील हायटेक कंपनी आर्थिक संकटात आली. वर्ष २०१८ मध्ये कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) अर्ज करून कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली. एनसीएलटीने चौकशी अधिकारी म्हणून आशिष राठी यांची नियुक्ती केली. सध्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे.
गुरुवारी नॅशनल आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुनील हायटेक इंजिनिअर्सची शेअरची (फेस व्हॅल्यू १० रुपये) किंमत ८० पैसे होती. एनएसईमध्ये २४० शेअर्सचे १९२ रुपयांत व्यवहार झाले. कंपनी दिवाळखोर घोषित झाली असतानाही गुरुवारी १९२ रुपयांची गुंतवणूक करणारी व्यक्ती कोण, हे जाणून घेण्यासाठी सर्वांना कुतूहल आहे.
या प्रक्रियेत सुनील हायटेक इंजिनिअर्सची एकमेव निविदा होती. सुनील हायटेकला मायनिंगचा कोणताही अनुभव नव्हता. कोल मायनिंग कॉन्ट्रॅक्ट नियमांचे उल्लंघन करून त्यांना कोल ब्लॉक देण्यात आला होता. सुनील हायटेकने हा कोल ब्लॉक मायनिंग व्यवसायासाठी उपकंपनी सुनील हायटेक एनर्जी लिमिटेडकडे हस्तांतरित करून प्रत्येकी १० रुपये किमतीचे एकूण १.८६ लाख शेअर मिळविले होते. त्यानंतर सुनील हायटेकने हे शेअर जास्त प्रीमियम घेऊन जेपी समूह आणि शेल इन्व्हेस्टमेंट कन्सलटन्सी प्रा.लि.ला विकून २५.४४ कोटी रुपये प्राप्त केले होते. रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा विजय गुट्टे यांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. केंद्रीय जीएसटी विभागाने विजय गुट्टेला ३४ कोटींच्या करचोरी प्रकरणात अटक केली होती.