सव्वादोन हजार भिक्षेकऱ्यांवर कारवाई
By admin | Published: July 20, 2016 02:07 AM2016-07-20T02:07:00+5:302016-07-20T02:07:00+5:30
नागपूर शहरातील विविध ठिकाणी भिक्षेकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येते. विशेषत: वाहतूक सिग्नलवर तर त्यामुळे
महिला भिक्षेकरी गृहाची सुरुवात : सहा महिन्यांत ३८ महिलांची रवानगी
नागपूर : नागपूर शहरातील विविध ठिकाणी भिक्षेकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येते. विशेषत: वाहतूक सिग्नलवर तर त्यामुळे फारच अडचण होते. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे. या पथकाकडून गेल्या साडेचार वर्षात सव्वादोन हजार भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी भिक्षेकऱ्यांवर होणारी कारवाई, सुधारगृहात रवानगी झालेल्या महिला भिक्षेकऱ्यांची संख्या इत्यादींबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१२ ते जून २०१६ या कालावधीदरम्यान शहरात २ हजार २७६ भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली. भिक्षेकऱ्यांवर सुरुवातीला वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत होती. परंतु २००३ पासून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले व या पथकाकडून भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली जाते.
नागपूर शहरात महिला भिक्षेकऱ्यांसाठी भिक्षेकरी गृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना समज देऊन सोडून देण्यात यायचे. २०१५ मध्ये १७ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
परंतु त्यावेळी महिला भिक्षेकरी गृह नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडून दिले होते. २०१६ मध्ये मात्र भिक्षेकरी गृह सुरू झाल्यामुळे जून महिन्यापर्यंत ३८ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)