ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला ऑटोचालक जुमानेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:13+5:302021-09-21T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या प्रवासी वाहतुकीचा कणा असलेले ऑटोरिक्षा चालक, सध्या ट्रॅफिक पोलिसांच्या कठोर कारवाईने चर्चेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या प्रवासी वाहतुकीचा कणा असलेले ऑटोरिक्षा चालक, सध्या ट्रॅफिक पोलिसांच्या कठोर कारवाईने चर्चेत आहेत. कधीही कुठेही थांबणे, रस्त्याच्या मधातच ब्रेक मारणे, प्रवाशांसोबतच इतरांशी मुजोरी करणे, वादावादी घालणे आदी अनेक तक्रारी आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात ऑटोरिक्षा चालकांवर कठोर कारवाई करत त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर पडत असल्याचे चिन्ह दिसत नाही, असेच चित्र सर्वत्र आहे. चौकाचौकात ऑटो उभे करून ग्राहकांची पळवापळवी करणे, हा ऑटोचालकांचा रोजचाच धंदा आहे. बऱ्याचदा महिला प्रवाशांशी असभ्य वर्तणूक करताना हे ऑटोचालक दिसून येतात. शिवाय, ग्राहक किंवा इतर वाहनचालकांशी वादावादी झालीच तर इतर ऑटोचालक मिळून संबंधिताशी मारहाण करण्यासारखे प्रकार नागपुरात घडत असतात. याविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी कंबर कसली आहे.
या ठिकाणी करतात रिक्षाचालक मनमानी
मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचे पूर्व व पश्चिम गेट तसेच इतवारी रेल्वे स्टेशनचे गेट, गणेशपेठ बस स्टॉप, मोरभवन बसस्टॉप, सीताबर्डी येथील झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, पंचशील चौक, महाल येथील टिळक पुतळा, सक्करदरा, रवीनगर चौक, फुटाळा अशा शहरातील विविध ठिकाणी ऑटोचालकांचा मोठा राबता असतो. येथून बसणाऱ्या प्रवाशांशी मनमानी करणे, ज्यादा पैसे आकारणे आणि नियमांची धूळधाण करणे आदी प्रकार घडत असतात.
मध्यवर्ती रेल्वे स्टेशन
मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिम द्वारावर ऑटोचालक कायम तैनात असतात. स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मागे ऑटोचालक धावतात. एकमेकांचे ग्राहक पळविण्याचे प्रकार सर्रास चालतात. अशा वेळी ग्राहक दुसऱ्याच ऑटोमध्ये बसला तर इतर ऑटोचालक बिनधास्त त्या प्रवाशाला शिव्याशाप देत असतानाचे चित्र नेहमीचे आहे.
गणेशपेठ बस स्टॅण्ड
गणेशपेठ बसस्टॅण्डच्या इन ॲण्ड आऊट गेटला ऑटोचालक थांबलेले असतात. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना संबंधित स्थळी जायचे अंतर तेवढेसे ठाऊक नसते. अशा वेळी हे ऑटोचालक बेमुर्वत भाडे आकारून त्यांची फसवणूक करत असतात. प्रवाशांनी त्यांना साद दिली नाही तर भिकारी है क्या, असे म्हणून अपमान केला जातो.
झांशी राणी चौक
शहरांतर्गत बसव्यवस्थेचा हा प्रमुख स्टॉप असल्याने आणि नजीकच मोरभवन बस स्टॉप असल्याने येथे शहरातील प्रवाशांची संख्या मोठी असते. येथून वाडी, महाल, वर्धा रोड, सदर आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना येथील ऑटोचालक वेठीस धरत असल्याचे प्रकार राजरोस दिसून येते. येथील काही ऑटोचालक महिला प्रवाशांची मस्करी करत असल्याचे चित्रही आहे. या परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीमधून हे प्रकार पोलिसांना तपासता येऊ शकतात.
--------------
कठोर कारवाई होणार
अनेक तक्रारींनंतर ट्रॅफिक विभागाने ऑटोचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या ऑटोचालकांवर पार्किंग, असभ्य वर्तणूक, युनिफाॅर्म कोड, कायदा भंग आदी कारवाई करण्यात येत आहे. शिवाय, ऑटोचालकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही छडा लावला जात आहे. ज्या ऑटो मालकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चालकांना ऑटो चालविण्यास दिले, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत आणि तसा इशाराही दिला जात आहे.
- सारंग आव्हाड, डीसीपी, ट्रॅफिक पोलीस, नागपूर
..................