मेडिकलच्या लेटलतिफ डॉक्टरांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:56 AM2017-08-02T01:56:22+5:302017-08-02T01:57:38+5:30
मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिक पंचिंग करीत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिक पंचिंग करीत नाही. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत नाही, अशा आमदारांनी केलेल्या तक्रारींची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली. मेडिकलच्या डॉक्टरांच्या उपस्थितीचा अहवाल तपासण्यात यावा व लेटलतिफ डॉक्टरांना नोटीस बजवा, असे निर्देश महाजन यांनी दिले.
मेडिकलमधील समस्यांचा प्रश्न आमदारांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केला होता. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी मुंबई येथे नागपूरच्या आमदारांची बैठक घेतली. तीत आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. डॉ. परिणय फुके यांच्यासह वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, मेडिकलचे अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. यावेळी आमदारांनी मेडिकलमधील अव्यवस्था, रुग्णांची होणारी गैरसोय व डॉक्टरांकडून उपचारात होणारा विलंब याचा पाढाच वाचला.
आ. अनिल सोले म्हणाले, मेडिकलमधील डॉक्टरांचे एजंटशी लागेबांधे आहेत. येथे रुग्णाला दर्जेदार उपचार दिले जात नाहीत. नंतर एजंटच्या मदतीने रुग्णाला खासगी इस्पितळात हलविले जाते. काही डॉक्टर तेथे नोकरी करतात व सोबतच खासगी इस्पितळ चालवितात. अशा डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. वर्षभरात ज्या रुग्णांची नोंदणी मेडिकलमध्ये झाली पण शस्त्रक्रिया मात्र खासगी इस्पितळात झाली, याचा अहवाल सादर करण्याचीही मागणी सोले यांनी केली. मेडिकलमधील बहुतांश पदे रिक्त असल्याकडे आ. माने यांनी लक्ष वेधले. रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी त्यांनी केली. आ. परिणय फुके म्हणाले, मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत.रुग्णांना सेवा मिळत नाही. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिकवर दररोजचे पंचिंग करीत नाहीत. येथे कार्यरत सर्व डॉक्टर व कर्मचाºयांचे तीन महिन्याचे बायोमेट्रिक पंचिंग तपासण्यात यावे, तसेच येथील उपकरणांचे ‘वर्क आॅडिट’ करावे, अशी मागणी त्यांनी केली. गिरीश महाजन यांनी या सर्व तक्रारींची दखल घेत १५ दिवसात सर्व मुद्यांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे यांना दिले.
११ आॅगस्टनंतर नागपुरात बैठक
मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांनी मेडिकलबाबत मांडलेल्या प्रश्नांवर वैद्यकीय शिक्षण सचिव ११ आॅगस्ट नंतर नागपुरात बैठक घेतील, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. तर, आपण व्यक्तिगतरीत्या लक्ष देऊन दोन महिन्यात मेडिकलमधील परिस्थिती सुधारू, अशी हमी सचिव संजय देशमुख यांनी दिली.