चहा-बिस्किटांसाठी शस्त्रक्रिया सोडणाऱ्या 'त्या' डॉक्टरवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:55 AM2023-11-18T10:55:50+5:302023-11-18T10:56:46+5:30
माफी मागितली, पण कारवाईचा प्रस्ताव जाणारच
नागपूर : खात (ता. मौदा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर चहा-बिस्किटे न मिळाल्याने डॉ. तेजराम भलावी हे शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यांनी माफीनामा दिला असला तरी आरोग्य विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील या प्रकारावर डॉ. भलावी यांना आरोग्य विभागाने स्पष्टीकरण मागितले होते.
चार महिलांना दिली होती भूल
- मौदा येथील खात आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबरला महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते.
- आरोग्य अधिकारी डॉ. तेजराम भलावी हे आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते.
- चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी इतर चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली होती.
परंतु, भूल दिलेल्या महिलांवर शस्त्रक्रिया न करताच डॉ. भलावी हे आरोग्य केंद्रातून अचानक निघून गेले.
- वेळेवर चहा-बिस्किटे न मिळाल्याने डॉक्टर येथून निघून गेल्याची बाब नंतर समोर आली.
डॉक्टर म्हणाले..
माझी रक्तशर्करा कमी झाल्याने वेळेवर चहा व बिस्किटे घ्यावी लागतात. ती न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने मला परत जावे लागले. आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाइकांना झालेल्या त्रासाबाबत माफी मागत आहे, असे डॉ. भलावी म्हणाले.