नागपुरातील अवैध आॅटोरिक्षाचालकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:20 PM2018-04-19T21:20:42+5:302018-04-19T21:20:53+5:30
खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवानाधारक आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवानाधारक आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरातील खासगी रिक्षा परवाना नोंदविण्यासाठी दोन्ही कार्यालयाने ३१ मार्चपर्यंत कालावधी दिला होता. या दरम्यान काही खासगी आॅटोरिक्षाचालकांनी शुल्क जमा करून नोंदणी केली. परंतु अद्यापही बहुतांश खासगी आॅटोचालक अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे शहरात १५ मेपर्यंत अशा आॅटोचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आॅटोरिक्षा संघटनांनी विनापरवाना खासगी आॅटोचालकाची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्याचे तसेच जनतेने खासगी संवर्गातील आॅटोरिक्षामध्ये प्रवास न करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.
शहरात सात हजार खासगी आॅटोरिक्षा
सूत्रानुसार, शहरात सात हजार खासगी आॅटोरिक्षा असून यातील साधारण १० टक्के आॅटोरिक्षांनी परवाने घेतले आहे, तर ९० टक्के चालकांकडे परवाना नसताना अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. परवानाधारक आॅटोरिक्षांची संख्या १५ हजार आहेत. यातील ३ हजार २०० आॅटोरिक्षा भंगारात काढूनही रस्त्यावर धावत आहेत.