समृद्धी महामार्गावरून जाताना वेळेच्या आधीच पोहचणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 08:48 PM2023-04-17T20:48:23+5:302023-04-17T20:48:51+5:30
Nagpur News ‘समृद्धी’ महामार्गावर प्रवेशानंतर गंतव्य ठिकाणी वाहन वेळेआधी पोहोचल्यास संबंधित वाहनावर दंड आणि त्यातील चालकाला सक्तीने रस्ता सुरक्षिततेचे समुपदेशन दिले जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.
नागपूर : ‘समृद्धी’ महामार्गावर प्रवेशानंतर गंतव्य ठिकाणी वाहन वेळेआधी पोहोचल्यास म.रा. रस्ते विकास महामंडळ मर्यादितच्या (एमएसआरडीसी) स्वयंचलित यंत्रणेमुळे संबंधित वाहनावर दंड आणि त्यातील चालकाला सक्तीने रस्ता सुरक्षिततेचे समुपदेशन दिले जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.
नागपुरातील आरटीओ कार्यालयात शनिवारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना भिमनवार पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गावर एकूण नऊशेहून अधिक लहान- मोठे अपघात झाले. त्यापैकी २२ प्राणांकित अपघातात ४० जणांचा मृत्यू झाला. प्राणांकितपैकी २२.७२ टक्के अपघात टायर फुटून, २७.२७ टक्के अपघात मागून पुढच्या वाहनाला धडक देऊन, १८.१८ टक्के अपघात चालकाला झपकी आल्याने झाले.
समृद्धीवर अतिवेगाने वाहन चालवून ९.०९ टक्के आणि इतरही कारणाने प्राणांकित अपघात नोंदवले गेले. येथे अपघातावर नियंत्रणासाठी परिवहन खात्याने बरेच उपाय केले. त्याचा सकारात्मक फायदा दिसत आहे. मार्च २०२३ मध्ये येथे १७ प्राणांकित अपघाताच्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये ९ प्राणांकित अपघात झाले. हे अपघाताचे प्रमाण आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी परिवहन खात्याने आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (एमएसआरडीसी)च्या स्वयंचलित वाहन निरीक्षण प्रणालीची मदत घेण्याचे निश्चित केले आहे.
त्यानुसार एखाद्या पथनाक्यावर वाहनाने समृद्धीचा प्रवास सुरू केल्यास ते इतर ठिकामी किती वेळात निघेल, ते बघितले जाईल. या मार्गावर कारची वेग मर्यादा १२० किमी प्रति तास, ट्रकची ८०, बसची १००, टँकरची ६० किमी प्रतितास निश्चित आहे. त्यानुसार या वेगाहून कमी वेळात हे वाहन गंतव्य ठिकाणी पोहचल्यास ते अतिवेगाने धावल्याने येथील पथनाक्याच्या द्वारावरील फाटक उघडणार नाही. तर येथे विशिष्ट सायरन वाजून अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल. त्यामुळे या वाहनावर एकीकडे दंडात्मक कारवाई केली जाईल.
तर दुसरीकडे येथील समुपदेशन केंद्रात चालकाला सक्तीने सुमारे ३० मिनटे रस्ता सुरक्षीततेबाबत समुपदेशन केले जाईल. सोबत येथे चालकाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार असल्याचेही भिमनवार यांनी सांगितले. सोबत समृद्धीवर प्रवास करणार्या वाहन चालकांची ब्रेथ अॅनलायझर तपासणी, लेनवर वाहन चालतात काय ही तपासणीसह इतरही तपासणी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. येथे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण आणि शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपस्थित होते.
‘समृद्धी’ महामार्गावर प्रवेशानंतर गंतव्य ठिकाणी वेळेआधी पोहोचणाऱ्या वाहनांवरील कारवाईला सोमवारपासून सुरुवात झाली. जालना येथून निघालेले एक वाहन अर्ध्या तासापूर्वीच नागपूरला पोहोचले. नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’च्या पथकाने वाहनाला थांबवून त्याच्यावर अतिवेगाने वाहन चालविण्याची दंडात्मक कारवाई केली. सोबतच चालकाला अर्धा तास थांबवून सक्तीने रस्ता सुरक्षिततेचे समुपदेशन केले.
‘स्पीड गन’सोबतच स्वयंचलित तंत्रज्ञानाची मदत
अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांची नोंद ‘स्पीड गन’मध्ये होऊन संबंधिताला नोटीस पाठविली जाते. त्याचबरोबर आता स्वयंचलित तंत्रज्ञानाची मदत घेत समृद्धी महामार्गावर धावणारे वाहन आपल्या गंतव्य ठिकाणी वेळेआधी पोहोचल्यास त्याच्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोबतच चालकाला अर्धा तास थांबवून त्याचे समुपदेशन केले जात आहे. अपघात थांबविण्यासाठी गतीला आवर घालणे आवश्यक आहे.
- विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण