धरमपेठेतील ‘त्या’ अतिक्रमणधारकावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:33 AM2017-09-02T01:33:15+5:302017-09-02T01:34:59+5:30

धरमपेठ भागाला सुरळीत व सुरक्षित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन, महापालिका व नागरिकांकडून केला जात आहे.

Action will be taken on the 'encroachers' of Dharampeth | धरमपेठेतील ‘त्या’ अतिक्रमणधारकावर होणार कारवाई

धरमपेठेतील ‘त्या’ अतिक्रमणधारकावर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देमुजोरीवर हातोडा : मनपा आयुक्तांनी दिले बांधकाम तोडण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ भागाला सुरळीत व सुरक्षित करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन, महापालिका व नागरिकांकडून केला जात आहे. अशात एका व्यक्तीने या सर्व प्रयत्नांवर पाणी सोडत कुणाचीही पर्वा न करता स्वत:ची वाहने पार्क करण्यासाठी रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. महापालिका प्रशासनाने अखेर याची दखल घेतली. संबंधित व्यक्तीचे बांधकाम तोडण्याचा आणि त्याला नोटीस बजावण्याचे आदेश मनपा आयुक्त अश्विन मुद््गल यांनी दिले आहेत.
अश्विन मुद््गल यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. विशेष म्हणजे लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून संबंधित व्यक्तीद्वारे होत असलेला हा प्रकार उघडकीस आणला होता. गेल्या काही दिवसांमध्ये धरमपेठ परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडण्याचा, पार्किंगची समस्या सोडविण्याचा आणि आदर्श परिसर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस आणि महापालिका प्रशासन करीत आहे. विशेष बाब म्हणजे येथील नागरिकांकडून या मोहिमेला कमालीचे सहकार्य केले जात आहे. नुकतेच या भागात नो-पार्किंग झोन करण्यात आले. हे करताना रस्त्यावरील फेरीवाले व दुकानदारांचेही अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्यावर येणारे अतिक्रमण सरसकट तोडण्यात येत आहे. नागरिकांच्याच पुढाकाराने खंडेलवाल ज्वेलर्स व इतर व्यवसायिकांनी फुटपाथवर आलेले त्यांचे अतिक्रमण नम्रपणे काढले. असे होत असताना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या भागातील एक उच्चभ्रू व्यक्ती या कारवाईला दाद देत नसल्याचे दिसून आले. खंडेलवाल ज्वेलर्सच्या अगदी समोर असलेल्या बंगल्याच्या मालकाने अतिक्रमणाचा कहर केला. या व्यक्तीने घरासमोरील फुटपाथवर बांधकाम तर केलेच, शिवाय घराच्या भिंतीलगतचे फुटपाथ सोडून चक्क रस्त्यावर स्वत:चे वाहन पार्क करण्यासाठी बांधकाम करून घेतले. परिसरातील नागरिक संबंधित व्यक्तीला अतिक्रमण काढण्याची विनंती करायला गेले असता त्यांच्याशीही मुजोरीची भाषा केल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी नंतर याबाबत मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे तक्रार केली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मनपाआयुक्तांनी संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून अतिक्रमण तोडण्याचे व कारवाईचे आदेश धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.

धरमपेठ भागात पार्किंग समस्या व वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस व मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. अशावेळी अशाप्रकारचे अतिक्रमण खपविले जाणार नाही. संबंधित व्यक्तीचे अतिक्रमण तोडण्याचे व नोटीस बजावण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
- अश्विन मुद््गल, आयुक्त, महापालिका नागपूर.

Web Title: Action will be taken on the 'encroachers' of Dharampeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.