‘टीप डील’ प्रकरणात कारवाई होणार
By admin | Published: February 16, 2016 04:01 AM2016-02-16T04:01:14+5:302016-02-16T04:01:14+5:30
तपासाशी कसलाही संबंध नसताना मोक्काच्या गुन्हेगारासोबत तब्बल ५३ वेळा संपर्क करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई
नागपूर : तपासाशी कसलाही संबंध नसताना मोक्काच्या गुन्हेगारासोबत तब्बल ५३ वेळा संपर्क करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केले.
गुन्हे शाखेतील दोन पोलिसांनी कुख्यात गुंडासोबत ‘टीप डील’ केल्याचे वृत्त लोकमतने १२ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. गेल्या चार दिवसांपासून या वृत्ताची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधाने पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली असता उपायुक्त शर्मा यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, ‘टीप डील’ प्रकरणाच्या चौकशीत कुलदीपची संशयास्पद भूमिका उघड झाली आहे. त्याच्या मोबाईलवरून ११ ते २९ डिसेंबर या कालवधीत कुख्यात दिवाकरशी तब्बल ५३ वेळा संपर्क झाला आहे. या प्रकरणाच्या तपासात त्याचा अथवा त्याच्या पथकाचा संबंध नसताना त्याने संपर्क केला, हेच संशयाला बळ देणारे आहे, असे शर्मा यांनी सांगितले. कुलदीपने इमिडेट बॉसच्या आदेशावरून संपर्क केल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत ज्याच्या मोबाईलवरून हे कन्व्हर्शन झाले, तो प्रथम आरोपी ठरतो, असेही उपायुक्त शर्मा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सर्वच गंभीर
पोलीस आयुक्तांपासून सारेच वरिष्ठ अधिकारी आणि अनेक कर्मचारी गुन्हेगारीची घाण साफ करण्यासाठी रात्रंदिवस झटत असताना गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी घाण वाढवण्यात पुढाकार घेत असल्याची बाब लोकमतच्या वृत्तामुळे जगजाहीर झाली. त्यामुळे सारेच गंभीर झाले आहेत. त्यामुळे दोषींवर कडक कारवाईचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. त्यामुळेच घाईगडबडीत कारवाई करण्याऐवजी सर्व बाजू तपासण्याचा आणि कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले.