आता नियम तोडल्यास ट्रॅव्हल्सवर कारवाई; आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम
By सुमेध वाघमार | Published: November 9, 2023 03:50 PM2023-11-09T15:50:36+5:302023-11-09T15:52:13+5:30
ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नागपूर : शहरातील ट्रॅव्हल्स कंपन्या नियम तोडून वाहतूक करीत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. या विषयावर बुधवारी नागपुरातील आरटीओ कार्यालयात बैठक झाली असता ट्रॅव्हल्सने स्वत:च्या कामात तातडीने सुधारणा न केल्यास आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम राबविण्यात येईल व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
बैठकीला पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण राजेश सरक, अशफाक अहमद, सहायक प्रादेशिक परविहन अधिकारी हर्षल डाके, स्नेहा मेंढेसह शहर व ग्रामीण भागातील आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक उपस्थित होते.
प्रथम वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमबाह्यरीत्या शहरात कुठे-कुठे मालवाहतुकीसाठी बसमध्ये नियमबाह्य माल भरले जातात, शहरातील विविध रस्त्यांचे काम सुरू असलेल्यासह इतर लहान रस्त्यांवर बस चालवल्याने कुठे वाहतूक कोंडी होते, प्रवाशांना रस्त्यावर कुठेही थांबून घेतले जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक समस्या, गणेश टेकडी येथील बसस्थानक स्थलांतरित करण्यासह इतरही अनेक पुरावे छायाचित्रासह बैठकीत दाखविण्यात आले. यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. तातडीने याचे पालन न झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला. यावेळी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियम पाळण्याचे व प्रवाशांना त्रास होणार नाही याचे आश्वासन दिले.
या मार्गावर असणार पोलीस, आरटीओची नजर
शहरातील जाधव चौक, लोहापूल चौक, शीतला माता मंदिर चौक, बोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, रहाटे कॉलनी चौक, गीतांजली टॉकिज चौक, गणेश टेकडी येथील बसस्थानक परसरात ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. आता या मार्गावर पोलीस आणि आरटीओची नजर असणार असून नियम तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.