नागपुरात स्कूल बसला दुचाकी धडकली, मुलगी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:54 PM2018-11-17T23:54:16+5:302018-11-17T23:56:32+5:30
वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगात असलेली दुचाकी स्कूलबसवर आदळल्याने दुचाकीवरील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
सोना मोहम्मद युनूस (वय १७, रा. शिवराम कॉम्प्लेक्स, फरस) असे मृत युवतीचे तर विदुला सुशांत अनिवला (वय १६, रा. रामदासपेठ) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. या दोघी त्यांच्या महादुलातील मैत्रिणीला भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी अॅक्टीव्हाने नागपूर सावनेर मार्गाने जात होत्या. सरस्वती विद्यालयासमोर विद्यार्थी उतरविण्यासाठी सोमेश्वर भीमराय कोसरे (वय ३२, रा. महादुला) या चालकाने रस्त्यावर स्कूल बस (एमएच ४०/ वाय ६५८२) उभी केली होती. दुचाकी अनियंत्रित झाल्याने उभ्या बसवर आदळली. त्यामुळे सोना आणि विदुला दोघेही गंभीर जखमी झाल्या. त्यांना मानकापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मध्यरात्रीनंतर सोनाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, विदुलाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताला स्कूल बसचालक कोसरेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज बांधून कोराडीच्या उपनिरीक्षक निर्मला वडे यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
वेगाची मर्यादा भोवली
ज्या अॅक्टीव्हाने हा अपघात घडला ती मोहम्मद युनूस यांनी ती नुकतीच विकत घेतली. तिला अजून आरटीओकडून पक्का नंबरही मिळालेला नाही. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळेच ती नियंत्रित झाली नाही, असे पोलिसांना प्रत्यक्षदर्शींपैकी काहींनी सांगितल्याचे समजते.