भरधाव दुचाकी क्रेनवर आदळली : तीन विद्यार्थिनींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 08:53 PM2018-08-14T20:53:30+5:302018-08-14T20:57:56+5:30
अंबाझरी तलावाजवळच्या टी पॉर्इंटवर भरधाव दुचाकी मेट्रोच्या क्रेनवर आदळल्याने दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी तलावाजवळच्या टी पॉर्इंटवर भरधाव दुचाकी मेट्रोच्या क्रेनवर आदळल्याने दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. रुषाली राजेश बनवारी (वय १८, रा. अंबाझरी), स्नेहा विजय अंबाडकर (वय १८, रा. हिलटॉप) रुचिका विजय बोरकर (वय १८, रा. तांडापेठ) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत.
रुषाली, स्नेहा आणि रुचिका या एलएडी महाविद्यालयाच्या बीकॉम प्रथम वर्षांच्या विद्यार्थिनी होत्या. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास त्या महाविद्यालयात जातो, असे सांगून घराबाहेर पडल्या. सकाळी ८.३० च्या सुमारास त्या अॅक्टिव्हावर (एमएच-४९/एझेड १५०२) जात होत्या. अंबाझरी तलावाच्या बाजूला असलेल्या टी पॉर्इंटजवळ त्यांची भरधाव दुचाकी समोरच्या क्रेनवर आदळली. त्यामुळे तिघीही गंभीर जखमी झाल्या. हा अपघात अत्यंत वर्दळीच्या मार्गावर झाला. दुचाकीच्या मागे असलेल्या एका पांढऱ्या कारचालकाने कार थांबवली. इतर वाहनचालकांनीही धाव घेऊन क्रेनच्या मागच्या बाजूला असलेल्या तिघींनाही उचलून कारमध्ये ठेवले आणि वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पोहचवले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातामुळे घटनास्थळ परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला पांगवून क्रेन जप्त केली. पोलिसांनी अपघाताचे कारण आणि दोष जाणून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात क्रेन समोर चालत असताना मुलींची दुचाकी मागून त्यावर आदळल्याचे दिसते. प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा वेग खूप जास्त होता अन् त्या ओव्हरटेक करीत पुढे जात होत्या. एका आॅटोला ओव्हरटेक केल्यानंतर अचानक समोर क्रेन आल्याने अनियंत्रित दुचाकी सांभाळणे शक्य झाले नाही. त्यामुळे दुचाकीने मागून क्रेनला जोरदार धडक दिली. ही धडक बसल्यानंतर चालकाने क्रेन थांबवली. तो गोंधळला अन् त्याने क्रेन समोर घेण्याऐवजी ती थोडी मागे घेतली. त्यामुळे दुचाकीसह तिघीही आतमध्ये दबल्या. प्रत्यक्षदर्शीने समोर जाऊन क्रेनचालकाला माहिती दिल्यानंतर त्याने क्रेन समोर केली. त्यानंतर या तिघींना बाहेर काढण्यात आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
आई, बाबा अन् रुचिका
अभ्यासात अत्यंत हुशार असलेली रुचिका तिचे मानलेले वडील भोजराज सदाशिव पराते यांची खूपच लाडकी होती. तिला १२ वीत प्रथम श्रेणी मिळाली होती. रुचिका लहान असताना तिची आई सोडून गेली. त्यानंतर रुचिकाच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हापासून रुचिका तसेच तिच्या लहान बहिणीला भोजराज पराते यांनी आपली मुलगी म्हणूनच सांभाळले. बारावी पास झाल्यानंतर तिला नवीकोरी अॅक्टिव्हा घेऊन दिली. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास ती घरून कॉलेजमध्ये पोहचल्यावर तिने भोजराज यांना फोन केला. यावेळी भोजराज यांच्याशी झालेले तिचे बोलणे शेवटचे ठरले. तिच्या मृत्यूने भोजराज यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. पत्रकारांशी बोलतांना त्यांना अश्रू आवरत नव्हते. रुचिकाची लहान बहीण एनसीसी कॅम्पच्या निमित्ताने पुण्याला गेल्याचे समजते. तिला त्यांनी सकाळी वेगळे कारण सांगून तातडीने नागपुरात येण्यास सांगितले आहे.
बंक जीवावर बेतला
असाच धक्का अंबाडकर आणि बोरीकर कुटुंबीयांनाही बसला आहे. स्नेहाचा मोठा भाऊ अभिषेक याला तर भावनावेगामुळे बोलताही येत नव्हते. रोज ती अभिषेकसोबत बोलून घराबाहेर पडायची. आज मात्र सकाळी ती न बोलताच निघून गेली. यावेळी रात्रपाळी आटोपून आलेले स्नेहाचे वडील झोपेत होते. सकाळी ८.४५ च्या सुमारास फोनवरून अपघाताची माहिती कळली. ते रुग्णालयात पोहचले अन् स्नेहा मृत झाल्याचे ऐकून त्यांचे अवसानच गळाले. सूत्रांच्या माहितीनुसार, रुचिका, स्नेहा आणि रुषाली यांनी कॉलेजमध्ये एक पिरियड केल्यानंतर बंक मारला. त्या कॉलेजमधून बाहेर पडल्या. त्या बंक मारून कुठे जात होत्या, ते कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांनी मारलेला बंक त्यांच्या जीवावर बेतला.
दोष कुणाकुणाचा ?
मेट्रो आणि सिमेंट रोडच्या कामामुळे रस्त्यात जागोजागी अडथळे आणि खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. दुचाकीचालकांना तर नेहमीच जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अशात वाहतूक पोलीस त्यांची जबाबदारी किती प्रामाणिकपणे पार पाडतात, हा संताप अन् संशोधनाचा विषय ठरतो. एरवी अपघात झाल्यानंतर जड वाहनचालकाला दोषी ठरवले जाते. या प्रकरणात मात्र क्रेनचालकापेक्षा जास्त दोष मुलींचाच असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचे पोलीस सांगतात.
दुसरे म्हणजे, या मुली ट्रीपल सीट सुसाट वेगाने दुचाकी चालवित असताना हेल्मेट घालून नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासोबतच वाहतूक शाखेच्या पोलिसांचाही दोष दिसून येतो. त्या घरून कॉलेजला आणि कॉलेजमधून बाहेर जात असताना कोणत्याच चौकात, सिग्नलवर कोणत्याच वाहतूक शाखेच्या पोलिसाला का दिसल्या नाही. त्यांच्यावर का लक्ष गेले नाही, पोलिसांचे लक्ष निव्वळ वसुलीतच असते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तिसरे म्हणजे, महाविद्यालयात विद्यार्थी दुचाकी घेऊन येतात, त्यांच्याकडे हेल्मेट नसताना त्यांना महाविद्यालय प्रशासन आतमध्ये कसा काय प्रवेश देते, असाही प्रश्न पुढे आला असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या हाती दुचाकी देणाऱ्या