ग्राम दक्षता समित्या सक्रिय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:21+5:302021-05-05T04:12:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेराेना संक्रमणाच्या पहिल्या लाटेच्या वेळी गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम दक्षता समित्यांच्या सदस्यांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेना संक्रमणाच्या पहिल्या लाटेच्या वेळी गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम दक्षता समित्यांच्या सदस्यांनी ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण राेखण्याच्या दृष्टीने भरीव कार्य केले हाेते. दुसऱ्या लाटेच्या वेळी या समित्यांचे सदस्य उदासीन असल्याचे दिसून आले. दुसरीकडे यावेळी ग्रामीण भागात काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या व मृत्यूदर वाढत असल्याने या समित्यांच्या सदस्यांनी सक्रिय हाेऊन उपाययाेजना करणे गरजेचे आहे, असे मत काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले.
पहिल्या लाटेच्या वेळी काेराेना वेशीवर राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार गावागावात ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या हाेत्या. या समित्यांच्या सदस्यांनी स्थानिक पातळीवर विविध उपाययाेजनांची अंमलबजावणी करीत गावांना काेराेना संक्रमणापासून दूर ठेवले हाेते. या सदस्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यापासून तर गावाच्या सीमा सील करणे, गावात दाखल हाेणाऱ्या तसेच गावाबाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यापर्यंतची कामे अहाेरात्र केली हाेती. या समित्या आजही कायम आहेत. मात्र, कुणीही काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायला तयार नाही. परिणामी, गावागावात काेराेनाचा शिरकाव झाला असून, रुग्णांसाेबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे.
या समित्यांच्या सदस्यपदी गावातील सरपंचापासून तर प्रतिष्ठित नागरिक, तरुण व स्थानिक कर्मचाऱ्यांचा नियुक्ती करण्यात आली आहे. यातील बहुतेकांना गावांमधील नागरिकांमध्ये आदर असल्याने ते उपाययाेजनांची अंमलबजावणी याेग्यरीतीने करू शकतात, हे पहिल्या लाटेच्या वेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी या ग्राम दक्षता समित्यांमधील सदस्यांना पुन्हा सक्रिय करणे अत्यावश्यक आहे. यासाठी तालुका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे अनेक नागरिकांनी सांगितले.
...
उपाययाेजनांचा फज्जा
ग्रामीण भागात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा उडालेला फज्जा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडला आहे. गावात बहुतांश नागरिक मनसाेक्त विनामास्क फिरत असून, गर्दीदेखील करीत आहेत; परंतु त्यांना कुणीही काहीच बाेलायला अथवा प्रतिबंध करायला तयार नाहीत. या उपाययाेजनांचे पालन केले जाते की नाही, हे बघण्याची जबाबदारी प्रशासनावर साेपविण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रत्येक गावातील या उपाययाेजनांवर लक्ष ठेवणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे यात लाेकसहभाग असणे अत्यावश्यक आहे.
...
कळमेश्वर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे नव्याने ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्याचे तसेच जुन्या समित्यांमधील सदस्यांना सक्रिय करण्यासाठी आवश्यक सूचना देणार आहाेत. याच समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांची काळजीसुद्धा घेण्यात येईल.
- सचिन यादव,
तहसीलदार, कळमेश्वर.