खासगी इस्पितळ प्रशासनाला धमकावणारे रॅकेट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:27 PM2020-07-10T21:27:57+5:302020-07-10T21:29:48+5:30
शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील खासगी इस्पितळाच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रिय असून यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची संशयवजा माहिती चर्चेला आली आहे.
विशेष म्हणजे, काही चर्चित व्यक्तींची बदनामी करून त्यांचा राजकीय गेम करण्याचा कट रचण्याचे संभाषण असलेली आॅडिओ क्लीप पोलिसांना मिळालेली आहे. त्या क्लीपमधून साहिलचे कनेक्शन पुढे आल्याची माहिती आहे.
साहिल सय्यद आणि गंटावार या दोघांच्या अर्थपूर्ण संबंधाच्याही पोलिसांना तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेला गुरुवारी चौकशीचे आदेश दिले. मानकापूर पोलिसांनी एलेक्सिस इस्पितळाचे डॉ. तुषार गावडे यांच्या तक्रारीवरून नुकताच साहिल सय्यद आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तपासणी अहवालाच्या मुद्यावरून साहिल आणि त्याच्या साथीदारांनी इस्पितळात गोंधळ घातला होता. डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन इस्पितळाची इमारत बुलडोझरने पाडण्याची धमकीही दिली होती. इस्पितळ प्रशासनाने तक्रार नोंदविल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. साहिल सय्यद हा खासगी इस्पितळात जाऊन डॉक्टरांना धमकावतो. त्यांच्याशी वाद घालतो. त्यानंतर इस्पितळात अनियमितता असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे करतो. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी गंटावार यांच्याशी साहिलची खास मैत्री असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी एक खळबळजनक आॅडिओ क्लीप पोलिसांना मिळाली. त्यात काही चर्चित व्यक्तींना बदनाम करण्यासाठी चर्चा केली जात असल्याचे समजते. या संबंधाने मिळालेल्या तक्रारी आणि आॅडिओ क्लीपची प्राथमिक चौकशी केली असता पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे गंटावार-साहिलच्या संबंधासोबतच इस्पितळ प्रशासनाच्या तक्रारी करणाऱ्या रॅकेटची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहे.
गुन्हेगारी अहवाल बाहेर
साहिल सय्यद यापूर्वीही अनेक प्रकरणात चर्चेला आला आहे. बनावट तक्रारी करून गंटावार सोबत संगनमत करून विशिष्ट हेतूने तो इस्पितळाच्या संचालकांना धमकावत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी ऑटोडील करणारा साहिल अचानक लाखोंचे व्यवहार करून नेतागिरी करू लागला. पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी अहवाल बाहेर काढला असून त्याची मालमत्ता अन साथीदारांचीही पोलीस आता कसून चौकशी करीत आहेत.