कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी वाढवली काळजी; २५ रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांनी ओलांडली शंभरी
By सुमेध वाघमार | Published: April 2, 2023 06:11 PM2023-04-02T18:11:38+5:302023-04-02T18:12:07+5:30
नागपूर कोरोनाच्या सक्रिय रूग्णांनी शंभरीचा आकडा ओलांडला आहे.
नागपूर : एकीकडे उन तापत असताना दुसरीकडे कोरोनाची भीतीही वाढत आहे. रविवारी २५ रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, सहा दिवसांतच अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांने आरोग्य विभागाची काळजी वाढवली आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत २१४ तपासण्या झाल्या. त्या तुलनेत ११.६८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्व बाधित २५ रुग्ण शहरातील आहेत. मागील तीन वर्षांत रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८७ हजार ५९८ झाली असून १० हजार ३५८ रुग्णांचे बळी गेले आहेत.
शहरात कोरोनाचे ८० रुग्ण
सध्या अॅक्टीव्ह असलेल्या १०१ रुग्णांमध्ये शहरात ८०, ग्रामीण भागात १८ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. यातील ७१रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. उर्वरीत रुग्णांमध्ये ११ रुग्ण मेडिकलमध्ये, रेल्वे हॉस्पिटलमध्ये ५, प्रादेशिक मनोरुग्णालयात २, एम्समध्ये १ यांच्यासह ११ रुग्ण विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराखाली आहेत.