‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार? फडणवीस यांनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 08:37 PM2022-12-19T20:37:54+5:302022-12-19T20:50:33+5:30
Nagpur News‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
योगेश पांडे
नागपूर : राज्यातील सरकारविरोधात काही लोक खोटे ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात विरोधी पक्षात काहीच दम नाही. त्यामुळे भाजपची लढाई ही विरोधकांशी नसून ‘नॅरेटिव्ह’शी आहे. त्यामुळे विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ मोडून काढत सकारात्मक दृष्टीकोन समाजापर्यंत नेला पाहिजे. मात्र ‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे सोमवारी झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या, ओमप्रकाश धुर्वे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संजय केणेकर, रणधीर सावरकर, विजय चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात २०-२० चे सरकार असून अडीच वर्षांसाठीच कार्यकाळ राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे. उर्वरित कालावधीत मला सरकारकडून काय मिळेल याची पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा करू नये. प्रसंगी त्यागाचीदेखील तयारी ठेवा, असे ते म्हणाले.
अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष ‘सोशल मिडीया’त ‘फेल’
यावेळी फडणवीस यांनी भाजपतर्फे राज्यपातळीवर घेण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ सर्वेक्षणावरून जिल्हाध्यक्षांना परखड बोल सुनावले. केवळ ९ जिल्हाध्यक्षांचे ‘सोशल मीडिया’वरील काम उत्तम आहे. तर ५ जणांचे काम सरासरी पातळीचे आहे. १५ जणांचे तर ‘सोशल मीडिया’वर अस्तित्वच नाही. अनेक आमदारांचीदेखील अशीच स्थिती आहे. प्रत्येकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त झाले पाहिजे व पक्षाची भूमिका सातत्याने मांडली पाहिजे. जे लोक अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत, त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे.
भाजपचे ‘मिशन ५१ टक्के व्होट’
भाजपचे राज्यात सरकार असले तरी आत्मसंतुष्ट होण्याची किंवा अतिआत्मविश्वास बाळगू नये. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू करायला हवी. निवडणूकीत ५१ टक्के मते मिळविण्याच्या दृष्टीने संघनट बळकट करण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन सी. टी. रवी व बावनकुळे यांनी केले