रंगभूमीशी प्रामाणिक असलेला कलावंत सोडून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 08:04 PM2019-02-04T20:04:14+5:302019-02-04T20:05:23+5:30
रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.
निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.
झाडीपट्टीची रंगभूमी दिवाळीपासून सुरू होते आणि साधारणत: मार्चच्या अखेरपर्यंत चालते. या काळात या नाटकांच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होते. या भागातील प्रेक्षकांना मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांची मोठी आवड. त्यावेळी रमेश भाटकर हे मराठी चित्रपट आणि मालिकांच्या सृष्टीचे मोठे नाव होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये आकर्षण होतेच. हे आकर्षण लक्षात घेता २००९ मध्ये जयदुर्गा रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांचे झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये आगमन झाले. एक दोन नाटकांचे प्रयोग नव्हे तर संपूर्ण सिझन भाटकर यांनी नाटकांचे प्रयोग केले. पुढे दुसऱ्या वर्षी साई रंगभूमी आणि त्यानंतरचे दोन वर्ष त्यांनी श्री चक्रधर रंगभूमी संस्थेसोबत काम केले. श्री चक्रधर संस्थेचे यशवंत ढोरे आणि प्रल्हाद मेश्राम यांनी सांगितले की २०११-१२ या काळात त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर ४३ नाटकांचे प्रयोग केले. तीन वर्षात दीडशेच्या आसपास त्यांनी या भागात सातत्याने प्रयोग केले होते.
त्यांनी सांगितले, चित्रपटसृष्टीचा मोठा कलावंत म्हणून ते कधीच वावरले नाहीत. सर्वांसोबत मिसळायचे आणि हसतमुख होते. यावेळी ते आपलाच झाडीपट्टीतला कलावंत आहेत असेच वाटायचे. मात्र एकदा मंचावर चढले की पात्रात घुसून जायचे. या काळात शेतकरी आत्महत्येवर आधारित ‘छळ, उद्ध्वस्त झाले घरटे सारे, हे चक्र जीवनाचे’ तर जयदुर्गा संस्थेसोबत ‘पैसा, पाझर’ आणि आक्रोश भारत मातेचा अशा कितीतरी नाटकांचे प्रयोग गावागावात केले. वेळेचे काटेकोर पालन करणारा हा कलावंत होता. सकाळी नाटकाची वेळ विचारायचे आणि वेळेच्या अर्धा तास आधी प्रयोगस्थळी पोहचत असत. एखादा कलावंत उशिरा आला की रमेश भाटकर त्याला झापणार हे निश्चित असायचे.
एकदा रमेशजी यांच्याविषयीची भीती घालविण्यासाठी नाटकातील एक कलावंत दारू पिऊन आला तेव्हा त्याला प्रचंड रागविल्याची आणि नंतर समजाविल्याची आठवण ढोरे यांनी सांगितली.
भाकरपार्टी खास आवडीची
या काळात त्यांचा मुक्काम वडसा येथील लॉजवर असायचा. मात्र ते लॉजवर थांबण्याऐवजी आमच्यासोबतच येऊन थांबायचे. नाटकाचा प्रयोग नसला की कुठेतरी शेतावर जाऊन भाकरपार्टी करणे त्यांना मनापासून आवडायचे. आम्हा सर्व कलावंतांना घेऊन ते कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळी जाऊन भाकरपार्टी करायचे. यावेळी लहानमोठे खर्च ते स्वत: करायचे. त्यामुळे आपला माणूस गेल्यासारखे वाटत असल्याचे आत्माराम खोब्रागडे यांनी सांगितले.
अहंकार नसलेले उदार व्यक्तिमत्त्व
झाडीपट्टीचे कलावंत चेतन राणे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. एकदा ‘झपाटलेला’ या नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना टपरीवरची भजी खाण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी आमच्यासोबत टपरीवर भजी खाल्ली. १५० रुपये झाले होते, तेव्हा ५०० ची नोट काढून दुकानदाराला दिली आणि भजी आवडली म्हणून बाकीचे पैसे ठेवून घेण्यास सांगितले. मोठे कलावंत असूनही अहंकार नसलेला हा उदार माणूस होता. झाडीपट्टीच्या प्रत्येक कलावंतांशी, तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्यांशीही ते मिसळून गेले होते. नाटकांमधूनच माझा उगम झाल्याचे ते नेहमी सांगायचे. आमचे नाटक प्रेक्षक म्हणून पाहायचे. त्यामुळे आपलाच माणूस असल्यासारखी जाणीव होत होती. आमचा माणूस सोडून गेल्यासारखे वाटत असल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. यावेळी नांदेडची अभिनेत्री सीमा कुळकर्णी यांनी, आमच्या चुका सांगणारा, अभिनयाचे बारकावे आणि मार्गदर्शन करणारा जवळचा माणूस हरविल्याची शोकमय भावना व्यक्त केली.