३७९ कोरोनाबाधितांची भर, ३९४ रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:18 AM2021-01-08T04:18:18+5:302021-01-08T04:18:18+5:30
नागपूर : ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असली तरी यातील एकही रुग्ण विदर्भातील नाही. ...
नागपूर : ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असली तरी यातील एकही रुग्ण विदर्भातील नाही. यातच पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेने नव्या कोरोना संशयित तिघांचा अहवाल निगेटिव्ह दिला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी ३७९ नव्या रुग्णांची भर पडली तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,२५,३३२ झाली असून, मृतांची संख्या ३,९६५ वर गेली आहे. आज बाधितांच्या तुलनेत अधिक ३९४ रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात आज ४,८४१ चाचण्या झाल्या. यात ३,९३७ आरटीपीसीआर तर, ९०४ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआर चाचणीमधून ३३८ तर ॲन्टिजेन चाचणीतून ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर शहरातील ३०८, ग्रामीण भागातील ६८ तर जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या ३ आहे. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत खासगी प्रयोगशाळेत सर्वाधिक ७९७ चाचण्या झाल्या. यातून १५७ बाधितांची नोंद झाली. एम्सच्या प्रयोगशाळेतून २२, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४१, मेयोच्या प्रयोगशाळेतून ५३, नीरीच्या प्रयोगशाळेतून १६, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ४९ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत १,१७,३५१ रुग्ण बरे झाले आहेत. ४,०१६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
-मेयो, मेडिकल, एम्समध्ये वाढले रुग्ण
मागील काही दिवसात मेयो, मेडिकल व एम्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मेडिकलमध्ये १७०, मेयोमध्ये ६८ तर एम्समध्ये ५३ रुग्ण भरती आहेत. विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात १३४६ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यातील खासगी रुग्णालयामध्ये १०५५ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, ९३ खासगी रुग्णालयामधून ४९ रुग्णालयामध्येच कोरोनाचे रुग्ण आहेत.
-दैनिक संशयित : ४,८४१
-बाधित रुग्ण : १,२५,३३२
_-बरे झालेले : १,१७,३५१
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४,०१६
- मृत्यू : ३,९६५