सिंचनासोबतच आता मत्स्यपालनही
By admin | Published: May 23, 2017 02:03 AM2017-05-23T02:03:42+5:302017-05-23T02:03:42+5:30
नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे.
विभागीय आयुक्त अनुप कुमार : तलाव तेथे मासोळी अभियानाचा आज शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या पुढकाराने या धोरणांतर्गत विभागीयस्तरावर तलाव तेथे मासोळी हे अभियान राबविले जात आहे. २३ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून या अभियानाला सुरुवात होत आहे. विभागातील २७४ महसूल मंडळामध्ये प्रत्येकी किमान १० तलावांवर मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धनाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नागपूर विभागात गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रात मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. विभागात सुमारे ७ हजार ४१५ प्रकल्प तसेच माजी मालगुजारी तलाव असून यामध्ये १४ मोठे, ४९ मध्यम, ६१८ राज्य व स्थानिक लघु सिंचन प्रकल्प तसेच ६ हजार ७३४ माजी मालगुजारी तलाव मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त असल्यामुळे विविध योजना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन घेणे शक्य आहे.
अभियानांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात किमान सहा तलावांमध्ये प्रति हेक्टरी ५ हजार बोटुकली याप्रमाणे १३ लक्ष ७० हजार बोटुकली संचय करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावांची निवड करणे तसेच जिल्हास्तरावरील उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर जून ते जुलै या कालावधीत मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धन करणे व आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत बोटुकली संचयन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे.
विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासोबतच अनुवांशिकदृष्ट्या सुधारित जातीच्या मासोळीचे संवर्धन करणे या माध्यमातून रोजगाराची निर्मिती तसेच खासगी मत्स्यसंवर्धन,
शेततळीधारक, सामान्य शेतकरी, बचत गट आदींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘तलाव तेथे मासोळी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य असून लाँगशिप कार्यक्रम म्हणून केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. अभियान मत्स्यव्यवसाय विकास विभाग, जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, आदिवासी विकास विभाग, पीएसआर, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मनरेगा आदी योजना एकत्र करून हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे.
विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर गोड्या पाण्याचे क्षेत्र
राज्यात सुमारे ३ लक्ष २२ हजार हेक्टर गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रापैकी नागपूर विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात १२.७४ हेक्टर, गोंदिया २१.३३५ हेक्टर, चंद्रपूर १७.७५२ हेक्टर तर गडचिरोली जिल्ह्यात ८.६५० हेक्टर क्षेत्रामध्ये मत्स्य शेती करण्याकरिता चांगला वाव आहे. मच्छिमारी व्यवसायात पारंपरिक काम करणारे एकूण ४ लक्ष २७ हजार लोकसंख्या असल्यामुळे एका तलावात सरासरी दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादन होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढविणे तसेच मानव विकास निर्देशांक उंचावण्यासोबत कुपोषण कमी करण्याला मदत मिळणार आहे.