दहा वर्षांनंतर मिळाले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:39+5:302021-06-18T04:06:39+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (एडीएचओ) ची दोन पदे जवळपास दहा वर्षांपासून रिक्त ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (एडीएचओ) ची दोन पदे जवळपास दहा वर्षांपासून रिक्त होते. त्यामुळे त्या पदांचा कारभार एकमेव असलेले एडीएचओंच्या खांद्यावर होता. कोरोनाच्या दोन्ही लाटे दरम्यानही या पदावर कुठल्याच अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली नाही. परंतु आता जवळपास दहा वर्षांनी या दोन्ही पदावर बढतीने दोन अधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सुदृढ होण्यास काहीप्रमाणात मदत होणार आहे.
जि. प.तील आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या अखत्यारित तीन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पदे आहेत. २०११ पासून यापैकी दोन पदे रिक्तच होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून एकमेव एडीएचओ डॉ. असिम इनामदार हे कार्यरत होते. उर्वरित रिक्त असलेल्या दोन्ही पदांचा कार्यभारही त्यांच्याच खांद्यावर होता. कोरोनाची पहिली व दुसरी या दोन्ही लाटांचा सामना करताना डॉ. सेलोकर यांच्या नेतृत्वात डॉ. इनामदार यांनी ग्रामीण भागातून कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी प्रयत्न केले व ते त्यात यशस्वीही झाले. आता रिक्त असलेल्या दोन एडीएचओ पदावर जवळपास दहा वर्षांनी नाशिक येथून पदोन्नतीने डॉ. धवल साळवे यांची नागपूर जि.प. येथे जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी या पदावर तर आरोग्य उपसंचालक कार्यालय नागपूर येथील डॉ. हर्षा मेश्राम वाकोडकर यांची पदोन्नतीने एडीएचओ पदी वर्णी लावण्यात आली आहे.