वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:20 AM2019-09-01T00:20:51+5:302019-09-01T00:22:08+5:30
वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास व दारू पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की भ्रष्टाचार फोफावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केला आहे. केंद्राचा हा कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे. यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जबर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. परंतु त्याचवेळी दंडाची रक्कम हजाराच्या घरात गेल्याने नियमांचे उल्लंघन करून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. शिवाय, भ्रष्टाचारात वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नागपुरात गणेश आगमनासोबत नव्या नियमांना घेऊन कारवाईचा श्रीगणेशा होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.
अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना शिक्षा
पूर्वी अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद होती. परंतु आता नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पूर्वी दारू पिऊन वाहन चालविल्यास २ हजार रुपये दंड होता आता तो १० हजारावर गेला आहे.
ट्रिपल सिटला २ हजाराचा दंड
‘ट्रिपल सिट’ बसवून दुचाकी दामटणाऱ्यांना आता खिशात २ हजार रुपये ठेवावे लागणार आहे. पूर्वी हा दंड केवळ १०० रुपये होता. तसेच पूर्वी सिग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यावर १०० रुपये दंड होता आता तो ५०० रुपये करण्यात आला आहे. सिटबेल्ट न बांधणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार १ हजार रुपये, विना विमा वाहन चालविणे २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
असा आहे दंड
- हेल्मेट न घातल्यास -१००० रु.
- सिग्नल तोडल्यास -५०० रु.
- लायसन्स नसताना वाहन चालविल्यास -५००० रु.
- वेगाने वाहन चालविल्यास -५०००रु.
- झिकझॅक पद्धतीने वाहन चालविल्यास -५०००रु.
- दारू पिऊन वाहन चालविल्यास -१०,०००रु.
- दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जणांना बसविल्यास -२०००रु.
- रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास -१०,०००रु.
- विमा नसताना वाहन चालविल्यास -२०००रु.
- वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास -५०००रु.
- मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास -२०,००० रु.