'नासुप्र'मध्ये अतिरिक्त प्रीमियम घोटाळा; दंडाऐवजी वर्ल्ड ट्रेड सेंटरला १५ कोटींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 07:03 PM2024-07-30T19:03:03+5:302024-07-30T19:03:37+5:30
विकास ठाकरे यांचा आरोप: विश्वस्त मंडळाचा निर्णय नियमबाह्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २३ जुलै २०२४ रोजी विकासक गोयल गंगा ग्रुप यांना अतिरिक्त प्रीमियर परत करण्याचा व सीताबर्डी येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने नासुप्रला १५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा मोठा घोटाळा असल्याने नासुप्रने हा प्रस्ताव रद्द करून जमीन ताब्यात घ्यावी. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि गोयल गंगा ग्रुपला काळ्या यादीत टाकावे आणि मोठ्या दंडाची वसुली करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.
विकासक गोयल गंगा ग्रुप यांनी सीताबर्डी येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम निर्धारित कालावधीत केलेले नाही. नासुप्रच्या जमीन वाटपाच्या नियमाच्या कलम १७ नुसार लीजधारकाने प्लॉटच्या ताब्यापासून एक वर्षाच्या आत इमारतीचे बांधकाम सुरू करणे आवश्यक होते. परंतु, या कालावधीत बांधकामाला सुरुवात न केल्याने नासुप्रने लीज रद्द करून जमीन आपल्या ताब्यात घेणे अपेक्षित होते. सभापतींनी अतिरिक्त प्रीमियम वसूल करून २०१४ पर्यंत बांधकामाला मुदतवाढ दिली. त्यानंतरही बिल्डरला वर्षभरात बांधकाम करता आले नाही. त्यानंतर बांधकामासाठी मुदतवाढ देणे अपेक्षित नसतानाही वेळोवेळी नासुप्रने मुदतवाढ दिली. हे नासुप्र कायदा व जमीन वाटप नियम व लीज दस्त ऐवजाचे उल्लंघन आहे. ही एक मोठी अनियमितता असून, बिल्डरला लाभ व्हावा, या हेतूने हा निर्णय घेतल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला आहे.
प्रस्ताव सर्वसमावेशक व नियमानुसार
"विकासकाने सर्वसमावेशक प्रस्ताव सादर केला आहे. सर्व तथ्य रेकॉर्डवर ठेवत नासुप्रकडे कायद्यानुसार प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर विस्तृत चर्चा केल्यानंतर नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने ठराव पारित केला आहे. आम्ही नागपूरच्या विकासासाठी आणि सीताबर्डी येथील अत्याधुनिक अनोख्या व्यावसायिक संकुलासाठी वचनबद्ध आहोत. यातून व्यापाराला चालना मिळेल आणि सर्वांना खरेदीचा आगळावेगळा अनुभव मिळेल."
- अनुप खंडेलवाल, उपाध्यक्ष, गोयल गंगा ग्रुप