डिसेंबरअखेर मुद्रांक विक्रीतून ६८ कोटीचा अतिरिक्त महसूल गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:02 AM2021-01-14T00:02:47+5:302021-01-14T00:05:52+5:30
Additional revenue collected from stamp duty राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के मुद्रांक शुल्क कपातीची घोषणा केल्यानंतर रजिस्ट्रीचा वेग वाढला होता. वेळेत रजिस्ट्री होत नसल्याचे पाहून शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत आगाऊ मुद्रांक शुल्क खरेदी करणाऱ्यांना पुढील चार महिने लाभ घेता येईल, अशी घोषणा पुन्हा केल्यानंतर लोकांनी घराच्या रजिस्ट्रीसाठी ६८ कोटीच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्काची खरेदी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के मुद्रांक शुल्क कपातीची घोषणा केल्यानंतर रजिस्ट्रीचा वेग वाढला होता. वेळेत रजिस्ट्री होत नसल्याचे पाहून शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत आगाऊ मुद्रांक शुल्क खरेदी करणाऱ्यांना पुढील चार महिने लाभ घेता येईल, अशी घोषणा पुन्हा केल्यानंतर लोकांनी घराच्या रजिस्ट्रीसाठी ६८ कोटीच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्काची खरेदी केली. त्याचा फायदा पुढील चार महिने लोकांना घेता येणार आहे.
मुद्रांक शुल्काचे लक्ष्य पूर्ण
कोरोना महामारीमुळे नागपूर शहर मुद्रांक शुल्क कार्यालयाला ४३० कोटीचे लक्ष्य दिले होते. शासनाने ३ टक्के कपातीची घोषणा केल्यानंतर हे लक्ष्य पूर्ण करतानाच डिसेंबरअखेर १२ टक्के वाढ नोंदविली आहे. अर्थात ४३० कोटीपेक्षा जास्त अर्थात नागपूर शहर मुद्रांक शुल्क कार्यालयाने ४८१ कोटीचा महसूल गोळा केल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग-१ (उच्च श्रेणी) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहरचे अशोक उघडे यांनी दिली.
आता शनिवारीही सुरू राहणार कार्यालय
अशोक उघडे म्हणाले, सर्वच कार्यालयांमध्ये रजिस्ट्रीसाठी लांबच लांब रांगा लागत आहे. याशिवाय रजिस्ट्रीची संख्या वाढल्याने कामांना उशीर होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन नागपूर शहरांतर्गत सदर व सक्करदरा ग्रामीण कार्यालयासह एकूण नऊ रजिस्ट्री कार्यालये जानेवारी महिन्यात शनिवार १६, २३ आणि ३० रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. या दिवशीही रजिस्ट्री होणार आहे.
रजिस्ट्रीसाठी लांब रांगा
प्राप्त माहितीनुसार, मुद्रांक शुल्क कपातीनंतर प्रत्येक कार्यालयात दररोज १५० पेक्षा जास्त रजिस्ट्री होत आहेत. त्यासाठी लांब रांगा लागत आहेत. अनेकदा सर्व्हर डाऊन होत असल्याने रजिस्ट्रीला चार ते पाच दिवस लागत आहेत. अनेकांना कार्यालयात चक्कर मारावी लागत आहे. अनेकांनी मुद्रांक शुल्क डिसेंबरमध्येच भरले आहेत. नागपूर शहरात नऊ कार्यालये आहेत. सर्वच कार्यालयात कामे वाढली असून या ठिकाणी एक हजारापेक्षा जास्त रजिस्ट्री वेटिंगवर आहेत. शहरांसोबत ग्रामीण कार्यालयांमध्येही गर्दी दिसून येत आहे.