रायपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघाती मृत्यू

By admin | Published: March 27, 2017 02:14 AM2017-03-27T02:14:00+5:302017-03-27T02:14:00+5:30

भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Additional Superintendent of Raipur accidental death | रायपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघाती मृत्यू

रायपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघाती मृत्यू

Next

पुतण्या आणि भाऊ जखमी : साहोली गावाजवळील घटना
नागपूर / पारशिवनी : भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. इसरार हुसेन खान (६४, रा. व्हीआयपी इस्टेट, खमारडी, रायपूर, छत्तीसगड) असे मृत अप्पर पोलीस अधीक्षकांचे नाव आहे. हा भीषण अपघात पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-खापरखेडा मार्गावरील साहोली गावाजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. अपघातात खान यांचा भाऊ आणि पुतण्या जबर जखमी झाले.
इसरार खान हे छत्तीसगड पोलीस दलात कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. मात्र, चांगल्या सेवेमुळे त्यांना सरकारने सेवानिवृत्तीनंतर सेवाविस्तार दिला. सध्या ते रायपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलीच्या विवाहाच्या संबंधाने चर्चा करायची असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलीसह ते नागपुरात आले होते. येथील जाफरनगरात त्यांचे लहान बंधू इरफान हुसेन खान परिवारासह राहतात. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली परिसरात जंगल सफारीसाठी जावे म्हणून भल्या पहाटे ते त्यांचे बंधू इरफान आणि पुतण्या मोहम्मद शादाब खान यांच्यासोबत जाफरनगरातून निघाले. रविवारी सकाळी एमएच-१२/के व्ही-८४४१ क्रमांकाच्या एक्सयुव्ही कारने जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर ते परत नागपूरकडे निघाले. सकाळी सुमारे १० च्या सुमारास साहोली गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे कारवरून शादाबचा ताबा सुटला. अनियंत्रित कार तीन कोलांट्या घेत उलटली. त्यामुळे इसरार खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही माहिती कळताच नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी रुग्णालय आणि अपघातस्थळाकडे धावले. छत्तीसगड पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी)

जायचे होते दिल्लीला...!
दिल्लीत राहणाऱ्या डॉक्टर मुलाकडे जाऊन मुलीच्या लग्नासंबंधीचा विचारविमर्श करण्यासाठी रविवारी खान त्यांची पत्नी आणि मुलीसह दिल्लीला जाणार होते. मात्र, मध्येच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्याऐवजी पत्नी आणि मुलीला त्यांचा मृतदेह रायपूरला नेण्याची दुर्दैवी वेळ आली.

Web Title: Additional Superintendent of Raipur accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.