आधार कार्डच्या बायोमेट्रिकवरून सापडले १४ अनोळखी मनोरुग्णांचे पत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 08:00 AM2023-05-28T08:00:00+5:302023-05-28T08:00:11+5:30
Nagpur News मनोरुग्णालयातील १४ अनोळखी रुग्णांचे आधार कार्ड तयार करताना बायोमेट्रिक करतेवेळी त्यांच्या घराचे पत्ते आढळून आले आहेत.
सुमेध वाघमारे
नागपूर : एकेकाळी परिस्थितीमुळे त्यांचा स्वत: शीच मानसिक संघर्ष सुरू होता. या संघर्षात ते पोलिसांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाले. अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. आता उपचाराने बरे झाले; परंतु घराचा पत्ताच आठवत नसल्याने रुग्णालयाच्या चार भिंतीत अडकून पडले. अशा अनोळखी रुग्णांचे आधार कार्ड तयार करताना बायोमेट्रिक करण्यात आले. यात एक-दोन नव्हे तर तब्बल १४ अनोळखी मनोरुग्णांच्या घराचे पत्ते सापडले. एकेकाळी मानसिक आजारामुळे विश्वच हरवून बसलेले हे रुग्ण आता आप्तांच्या भेटीसाठी आसुसले आहेत.
सामाजिक, आर्थिक कारणांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक वर्षांच्या उपचारानंतर ते बरे होत आहेत. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या लक्षात येत आहे. बरे झाल्यावर कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नसल्याचे वास्तव ‘शॉक’ पेक्षाही वेदना देणारे ठरत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्या ४८० मनोरुग्ण उपचार घेत आहेत. यातील ९६ पुरुष व १०४ महिला असे आहेत. ज्यांना स्वत: ची ओळखच नाही. यातील बरे झालेल्यांना सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची इच्छा आहे; परंतु पत्ताच माहिती नसल्याने मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत जगावे लागत आहे. जगण्याची उमेद गवसलेल्या या सर्वांना आजही स्वकियांचा शोध आहे.
-आधार कार्डमुळे लागला घरांचा शोध
प्रादेशिक मनोरुग्णालयांचे प्रभारी डॉ. श्रीकांत कोरडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले, मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक अनोळखी रुग्णाचे आधार कार्ड काढले जाते. आतापर्यंत १९६ रुग्णांचे आधार कार्ड काढण्यात आले. ज्या रुग्णांचे डुप्लिकेट आधार कार्ड होते, त्याचे बायोमेट्रिक करण्याचे ठरविले. २० मे रोजी बायोमेट्रिक कॅम्प आयोजित केला. यात १४ रुग्णांना त्यांच्या नावासह घराचे पत्तेही मिळाले. हे पहिल्यांदाच झाले.
-आंध्र प्रदेशासह बिहार राज्यातील हे रुग्ण
पत्ते मिळालेल्या १४ रुग्णांमध्ये ८ पुरुष तर ६ महिला आहेत. यात महाराष्ट्रातील ५, आंध्र प्रदेशातील व मध्य प्रदेशातील प्रत्येकी ३ तर, छत्तीसगड व बिहार राज्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे, यातील २ रुग्ण ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे तर, उर्वरित १२ रुग्ण हे २५ ते ४० च्या घरातील आहेत.
-रुग्णांच्या घरच्यांशी लवकरच संपर्क
पत्ते मिळविण्यासाठी स्थानिक पोलिस व सरपंचाची मदत घेतली जाईल. पत्ता जर बरोबर असेल तर त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला जाईल. यादरम्यान बरे झालेल्या या १४ जणांना ‘मानसिक आरोग्य पुनरावलोकन बोर्ड’ मध्ये उभे केले जाईल. त्यांची मंजुरी मिळाल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात येईल. यासाठी नातेवाइकांना रुग्णालयात बोलविले जाईल. ज्यांना शक्य नाही, अशा रुग्णांना रुग्णालयामार्फत घरी पाठविण्यात येईल.
-डॉ. श्रीकांत कोरडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय.