नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता
By सुमेध वाघमार | Published: March 1, 2023 07:00 AM2023-03-01T07:00:00+5:302023-03-01T07:00:10+5:30
Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत.
नागपूर : पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. मागील दोन वर्षे बंद असलेली शाळा, कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती यामुळे हा ‘व्हायरस’ वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालमधील काही मुलांची चाचणी केली असता श्वसनाचा संसर्ग असलेल्या जवळपास ३२ टक्के नमुन्यांमध्ये ‘ॲडोनो व्हायरस’ आढळून आला. ताप, खोकला, नाक वाहणे किंवा श्वसनाचा त्रासानंतर पुढे न्यूमोनियाच्या संसर्गामुळे मुलांचा मृत्यू झाले आहेत. यामुळे येथील काही शाळांमध्ये ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ व ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम लागू केले आहेत. लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहनही केले जात आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु, त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.
- कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती ठरतेय कारण
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘ॲडोनो व्हायरस’ आपल्याकडे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत दिसून येतो. हा एक सामान्य ‘व्हायरस’ आहे; परंतु, कोरोनामुळे मागील दोन वर्षे बंद असलेल्या शाळा आणि घरातच मुले बंद असल्याने या ‘व्हायरस’ला पसरण्यास वाव मिळाला नाही; परंतु, आता शाळा सुरू झाल्याने आणि त्यात मुलांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झाल्याने या वर्षी ‘ॲडोनो व्हायरस’चे रुग्ण अधिक प्रमाणत दिसून येत आहे; परंतु, आपल्याकडे पश्चिम बंगालसारखी स्थिती नाही. ‘न्यूमोनिया’ची लक्षणे दिसून येत नाहीत.
-ही आहेत लक्षणे
डॉ. शिंदे म्हणाले, हा व्हायरस सहसा शाळेतील विद्यार्थ्यांकडून घरातील व्यक्तींना होतो. चार दिवसांपेक्षा जास्त ताप, सर्दी, खोकला, विकनेस, डोळे लाल होणे, अस्थमा आदी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये डायरियासुद्धा दिसून येतो. हा आजार गंभीर नाही. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले.