रेल्वे परिसरात कुणाच्या पार्किंगवर कुणाचा कब्जा; दिव्यांगांची कुचंबना, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By नरेश डोंगरे | Published: April 22, 2023 05:00 PM2023-04-22T17:00:41+5:302023-04-22T17:03:37+5:30
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम द्वाराकडे पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही
नागपूर :रेल्वेस्थानक परिसरात पुरेशी पार्किंगची सोय नसल्यामुळे अनेक दुचाकी चालक दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या पार्किंगमध्ये आपल्या दुचाकी पार्क करतात. त्यामुळे बिचाऱ्या दिव्यांग व्यक्तींची मोठी कुचंबना होत आहे.
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम द्वाराकडे पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही. येथे ऑटोवाले दिवस रात्र गोंधळ घालत असतात. त्यामुळे रेल्वेचे अनेक कर्मचारी त्यांच्या दुचाकी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसरात उभ्या करतात. याच भागात एससी एसटी रेल्वे एम्पलोयी असोसिएशनचे कार्यालय आहे. या परिसरात एक जागा दिव्यांग व्यक्तीच्या दुचाकींसाठी आरक्षित आहे. मात्र या जागेमध्ये रेल्वेचे कर्मचारी विविध विभागात नोकरी करणारे आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून अपडाऊन करणारे कर्मचारी, वेंडर, छोटे मोठे दुकानदार आणि कामाच्या निमित्ताने रेल्वे स्थानक तसेच डीआरएम कार्यालयात येणारी मंडळी या दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या पार्किंगमध्ये आपल्या दुचाक्या लावतात. त्यामुळे ज्यांच्यासाठी ही जागा आरक्षित आहे त्या दिव्यांगांना त्यांच्या दुचाक्या येथे लावण्यासाठी अडचण निर्माण होते. विशेष म्हणजे, ही बाब रात्रंदिवस संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेत पडते. परंतु कोणताही अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला अथवा दिव्यांगाची होत असलेली कुचंबना थांबवण्यास तयार नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार
दिव्यांगाची होत असलेली कुचंबना लक्षात घेऊन भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत कुमार शुक्ला यांनी रेल्वेच्या वाणिज्य विभाग व्यवस्थापकांकडे तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दिव्यांगासाठी पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या या जागेवर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस इथे दुचाकी पार्क करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणीही शुक्ल यांनी या तक्रार पत्रात केली आहे.