कार्यालयात होईना कोविड प्रोटोकॉलचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:56+5:302021-07-04T04:06:56+5:30

नागपूर : शासकीय आणि खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीच्या अटीसह सुरू करण्यात आली आहेत; परंतु तरीसुद्धा या कार्यालयांत कोविड ...

Adherence to Kovid protocol in the office | कार्यालयात होईना कोविड प्रोटोकॉलचे पालन

कार्यालयात होईना कोविड प्रोटोकॉलचे पालन

Next

नागपूर : शासकीय आणि खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीच्या अटीसह सुरू करण्यात आली आहेत; परंतु तरीसुद्धा या कार्यालयांत कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत नसल्याची स्थिती आहे. क्षमतेनुसार ५० टक्के कर्मचारी कार्यालयात जात आहेत; परंतु कामाच्या ठिकाणी मर्यादित जागा असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. एवढेच नव्हे तर कर्मचारी सोबत मिळून भोजन करीत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीतीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक कर्मचारी कार्यालयात सहकाऱ्यांच्या संपर्कात असताना सतत कोरोनाचा विचार करीत असल्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा येत असल्याची स्थिती आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ...

मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेश राठी यांच्या मते दररोज याबाबतचे चार ते पाच रुग्ण येत आहेत. ही सामान्य बाब नाही. ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना पुन्हा होण्याची भीती वाटत आहे. ज्यांना झाला नाही त्यांना पुढे होण्याची भीती आहे. सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु गरज नसताना अधिक भीती वाटणारे रुग्ण येत आहेत. अशा रुग्णांना बाहेर जाण्यासही भीती वाटत आहे. भीतीमुळे त्यांना झोप येत नाही. थोडी तब्येत बरी वाटली नाही तर त्यांना कोरोना झाल्यासारखे वाटत आहे. तणाव आणि चिंतेमुळे शरीरात रासायनिक प्रक्रियेत बदल झाल्यामुळे असे घडते.

कार्यालयात वाटते भीती

सॉफ्टवेअर इंजिनिअर राहुल नाईक यांनी सांगितले की ते एका खासगी कार्यालयात कार्यरत आहेत. कोरोना झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यालयात जाणे सुरू केले. कार्यालयात इतर लोकही बसत असल्यामुळे त्यांना असुरक्षित वाटते. ते अनेकदा सॅनिटायझरचा वापर करतात. फाईल देताना त्यांना भीती वाटते. त्यांच्या मते अती तणाव आणि कोरोनाच्या भीतीमुळे त्यांच्यात चिडचिडेपणा आला आहे. अशा स्थितीत त्यांनी मनोविकार तज्ज्ञांचा सल्लाही घेतला आहे.

मानसिक तणाव वाढला

शासकीय बँकेत कार्यरत विजय साहू यांनी सांगितले की बँक सुरू आहे. परंतु पूर्वी कमी लोक बँकेत येत होते. आता गर्दी वाढली आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोना होण्याची भीती वाटत राहते. दुसऱ्या लाटेत त्यांची आई पॉझिटिव्ह झाल्यामुळे तिला आयसीयूत भरती करावे लागले होते. त्यांना कार्यालयात येण्याची भीती वाटते. बँकेत सहकारी किंवा नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना होईल अशी त्यांना भीती वाटते. विजयच्या पत्नीने मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेतला असता ते गंभीर मानसिक तणावात असल्याचे समजले.

.............

Web Title: Adherence to Kovid protocol in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.