नागपुरात अमित शाहांच्या चाणक्यनितीचे पालन, भाजपकडून महाविकासआघाडीच्या बूथवर फोडाफोडी सुरू
By योगेश पांडे | Published: October 30, 2024 09:09 PM2024-10-30T21:09:54+5:302024-10-30T21:10:14+5:30
बुथपातळीवरच विरोधकांवर वार केला तर त्याचा फटका प्रचारादरम्यान बसेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नागपूर : सर्वसाधारणत: निवडणूकीच्या काळात विरोधी पक्षातील मोठे नेते व पदाधिकारी फोडण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. मात्र या निवडणूकीत भाजपने बुथ पातळीवरील कार्यकर्ते ‘टार्गेट’ केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरातच सांगितलेल्या सूत्रानुसार भाजपने शहरातील काही भागांमध्ये विरोधकांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू केली आहे. बुथपातळीवरच विरोधकांवर वार केला तर त्याचा फटका प्रचारादरम्यान बसेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
२४ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या दृष्टीने १० सूत्रे सांगितली होती. यावेळी अमित शाह यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बूथपातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे बूथपातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना बूथपातळीवर कमकुवत करण्यावर भर द्या, असे शाह यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर पक्षाच्याच विविध उपक्रमांमध्ये पदाधिकारी व्यस्त झाले व याकडे दुर्लक्ष झाले. मात्र निवडणूकीमुळे राजकारण तापले असताना भाजपने आता यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
पुर्व नागपुरात भाजपने महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क करत भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. दोन दिवसांअगोदरच कॉंग्रेसच्या जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्व कार्यकर्ते बुथपातळीवरील कार्यकर्ते होते. केवळ पुर्व नागपुरच नव्हे तर शहरातील इतर पाचही मतदारसंघांमध्येदेखील भाजपकडून महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. पश्चिम नागपुरात आम आदमी पक्ष, उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये आले असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली. पुढील आठवड्यात पक्षात आणखी कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ होईल असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.