एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:01 PM2022-12-22T15:01:13+5:302022-12-22T15:05:34+5:30
घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुशंतासिंह राजपूत, दिशा सालियन व रिया चक्रवती प्रकरणावरुन तापलाय. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सत्ता पक्षावर जोरदार टीका केली. ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपाल यांनी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला, त्यांना व घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. एका ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
विधिमंडळ अधिवेशनाचा आज ४ था दिवस एयु.. एयु कौन है? च्या मु्द्दयाने गाजतोय. सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे असून या प्रकरणाची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवित टीका केली. ते म्हणाले, लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या.. महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीहून दिशा सालियन प्रकरणी चौकशी अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. तो पाहून पुढील चौकशीचे स्वरुप ठरविले जाईल, कोणाकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असे फडणवीस म्हणाले आहेत.
नितेश राणे काय म्हणाले...
एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला. सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.