आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:36 PM2019-02-12T23:36:14+5:302019-02-12T23:37:22+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण्यात आले. मंगळवार सकाळपासून वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागला. यामुळे महाराज बाग, सीताबर्डी, धंतोली या भागात वाहतूक कोंडी दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण्यात आले. मंगळवार सकाळपासून वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागला. यामुळे महाराज बाग, सीताबर्डी, धंतोली या भागात वाहतूक कोंडी दिसून आली.
‘स्टील गर्डर ब्रिज’च्या कामासाठी लोखंडाच्या अवजड यंत्र व सामानाचा वापर होणार असल्याने नागरिकांना धोक निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभागाकडून अस्थायी पद्धतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा पूल बंद राहील. यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
मॉरिस टी पॉईंटकडून रहाटे कॉलनी चौकापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांना मंगळवारी उड्डाण पुलाखालील मार्गाचा उपयोग करावा लागला. वाहनचालकांना अडचण येऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण मार्गांवर ‘ट्रॅफिक मार्शल’ तसेच ‘क्विक रिस्पॉन्स टीम’देखील तैनात करण्यात आली होती. याअगोदर छत्रपती चौकातील पूल पाडण्यासाठीदेखील वाहतूक वळविण्यात आली होती. त्यावेळीदेखील लोकांनी सहकार्य केले होते. यावेळेसदेखील असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दोन ‘क्रेन्स’चा उपयोग
जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर ‘मेट्रो’च्या दोन खांबांवर ४०० मीटरच्या लांबीच्या या कार्याला ४०० व २२० मेट्रीक टन क्षमतेच्या २ ‘क्रेन्स’चा उपयोग नागपूर मेट्रोकडून करण्यात येत आहे.