आदिवासी हलबा भाजपाच्या विरोधात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:55 PM2018-03-26T23:55:39+5:302018-03-26T23:59:03+5:30
हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आदिम कर्मचारी-अधिकारी यांचा विचारमंथन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दे. बा. नांदकर अध्यक्षस्थानी होते तर आदिम नेत्या अॅड. नंदा पराते, विश्वनाथ आसई, चंद्रभान पराते, धनंजय धापोडकर, पुंडलिक नांदूरकर व्यासपीठावर होते.
आ. कुंभारे म्हणाले, हलबा समाजाला जात व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा बैठक घेऊन निर्णय घेतला. परंतु निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. हलबांना न्याय देण्याचे आश्वासन देऊनही तीन वर्षात पूर्तता झाली नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलनही केले; परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अॅड. नंदा पराते म्हणाल्या, भाजपाने हलबांचा विश्वासघात केला आहे. आम्हाला संविधानाप्रमाणे अधिकार मिळाले नाही तर आमच्या मतावर राजकारण करणाऱ्या भाजपा नेत्यांना येत्या निवडणुकीत फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अन्याय दूर न झाल्यास येत्या निवडणुकीत ‘हलबा बचाव-भाजपा हटाव’ असा नारा देण्यात येईल, असे कामगार नेते विश्वनाथ आसई यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक रमेश पुणेकर, राजू धकाते, अरुण सोनकुसरे, किशोर मिजे, यशवंत खापरे, नागोराव पराते, प्रकाश दुलेवाले, राकेश देवीकर, डॉ. चिंंतामणी सोनकुसरे, रामेश्वर बुरडे, गजानन नंदनकर, जागेश्वर कुंभारे, सुखदेव फुलवाले, धीरज बारापात्रे, विलास निपाणे, भास्कर चिचघरे, मंजूषा धार्मिक, प्रशांत निखारे, श्रीकांत धकाते, जितेंद्र वेळेकर यांनी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक ओमप्रकाश पाठराबे यांनी केले. संचालन धनराज पखाले यांनी केले. मनोहर घोराडकर यांनी आभार मानले.